पहिल्यांदाच मतदान; तरुणाईमध्ये लई भारीची भावना..!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्याने आलेला भारी ‘फील’… त्यातच थेट लोकसभेसाठी मतदान करण्याचा मिळालेला हक्क… भारताचे नागरिक म्हणून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याची मिळालेली संधी… यामुळे पहिल्यांदाच मतदान करीत असलेल्या नवमतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. त्याचवेळी तंत्रज्ञानाच्या युगात मतदान केंद्र शोधण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. पहिल्या मतदानाची क्रेझ …

पहिल्यांदाच मतदान; तरुणाईमध्ये लई भारीची भावना..!

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्याने आलेला भारी ‘फील’… त्यातच थेट लोकसभेसाठी मतदान करण्याचा मिळालेला हक्क… भारताचे नागरिक म्हणून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याची मिळालेली संधी… यामुळे पहिल्यांदाच मतदान करीत असलेल्या नवमतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. त्याचवेळी तंत्रज्ञानाच्या युगात मतदान केंद्र शोधण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
पहिल्या मतदानाची क्रेझ
पुणे लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. 13) झालेल्या मतदान प्रक्रियेत अनेक नवमतदारांनी लोकशाहीच्या या प्रक्रियेत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील नवीन मतदार कनिष्क हिरवे याने पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावताना आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली. कनिष्क बीबीए सेकंड इअरला सिम्बायोसिस महाविद्यालयात शिकतो. नुकतीच 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याने मतदानाचा हक्क बजावला. या वेळी बोलताना तो म्हणाला, लोकशाहीच्या या मतदान प्रक्रियेमध्ये पहिल्यांदा सहभाग घेता आला. याचा मला आनंद आहे. भारताच्या सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवायला हवा. देशाच्या विकासासाठी मतदानाचा हक्क बजावणे आपले कर्तव्य आहे.
मतदार… काही नवखे, तर काही अनुभवी
सोशल मीडिया हे दररोजच्या घटनांचे प्रतिबिंब बनले आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीही त्याला अपवाद ठरली नाही. विविध मेसेज, मतदान केल्यावर पोस्ट केलेले सेल्फी, मतदारांनी आपल्या आप्तांना, मित्रपरिवाराला मतदानासाठी बाहेर पडण्याचे केलेले आवाहन, अशा विविध पोस्ट्सनी सोशल मीडियावरही निवडणूक रंगली. फेसबूक पेज हे प्रत्येकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे व्यासपीठ बनले. चर्चा, आरोप-प्रत्यारोप, तात्त्विक वाद अशा अनेक प्रकारांनी सोशल मीडियाची पाने, व्हॉट्सअ‍ॅपचे ग्रुप रंगतात. सोमवारी लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला आणि सोशल मीडियावर निवडणूक ‘सेलिब्रेट ’ झाली.
‘पुरुषांनो, तुमच्या मतांची घराला किंमत नसली, तरी देशाला आहे’, ‘फेसबुकवर फोटो टाकला नाही, तर मतदान ग्राह्य धरले जाणार नाही का?’, ‘तुम्ही कितीही मोठ्या इंग्रजी शाळेत शिका, मतदान करायला शेवटी मराठी शाळेतच जावं लागतं’, असे मिश्कील मेसेज नेटिझन्सनी विविध ग्रुप्सवर पोस्ट केले होते. ‘व्होट फॉर बेटर इंडिया’, ‘देशहिताचे भान, 100 टक्के मतदान’, ‘मतदान उज्ज्वल भविष्यासाठी’, ‘आपले बहुमूल्य मत वाया घालवू नका’, ‘दुपारपर्यंत खूप कमी मतदान झालंय, लवकर घराबाहेर पडा आणि आपला हक्क बजावा’ अशा मेसेजच्या माध्यमातून नेटिझन्सनी जनजागृतीसाठी पुढाकार घेतलेला दिसला. सेल्फी हा प्रत्येकाचा आवडता छंद. मतदान केल्यानंतर तरुणांनी आपापल्या कुटुंबासह सेल्फी काढून व्हॉट्सअ‍ॅपचे स्टेटस म्हणून ठेवले होते. ‘राष्ट्रीय कर्तव्य’ असे टॅग करत अनेकांनी सेल्फी पोस्ट केले. सोशल मीडियाला निवडणुकीच्या मैदानाचे चित्र आल्याची प्रतिक्रिया तरुणाईने व्यक्त केली.
मी यंदा पहिल्यांदाच मतदान करत आहे. वडिलांच्या मदतीने वेबसाइटवर नाव आणि इतर माहिती भरून मतदान कोणत्या केंद्रात आहे, हे शोधून ठेवले होते. तिथे गेल्यावर माझे नाव तेथील यादीत नसल्याचे समजले. तेथील कार्यकर्त्यांनी दुस-या केंद्रात आणि तिथून तिस-या केंद्रात पाठवले. शेवटी थोरात उद्यानातील मतदान केंद्रावरील यादीत नाव सापडले. तासभर धावपळ करावी लागल्याने उत्साह मावळला. तरीही पहिली वेळ म्हणून मतदान करणार आहे.
– मधुरा जाधव
मी सोलापूरला एका महाविद्यालयात शिकते. सोलापूरचे मतदान आधीच पार पडल्याने मला कॉलेजने मतदानासाठी सुटी द्यायला नकार दिला, पण विरोध डावलून मी पुण्यात मतदानाला आले. मतदान केल्यावर खूप छान वाटत आहे. लोकसभेचे मतदान असल्यामुळे खूप उत्सुकता होती. एका मताने काय होते, असे अनेकांना वाटते. पण, जबाबदार नागरिक म्हणून मतदानाचा हक्क बजावायला हवा.
– शर्वरी कर्‍हाडकर

सकाळच्या सत्रात जोर, दुपारनंतर तुरळक गर्दी
पर्वती मतदारसंघातील सर्वच मतदान केंद्रांत सकाळी सात वाजण्याच्या ठोक्याला मतदार आले होते. सहकारनगर भागातील अरण्येश्वर विद्यालय, शिंदे हायस्कूल, शंकरशेठ रस्त्यावरील मेलोरिना हायस्कूल, मार्केट यार्ड परिसरातील क्रिसेंट हायस्कूल, सिटी इंटरनॅशनल स्कूल, संत ज्ञानदेव प्राथमिक विद्यालय, पर्वती पायथा येथील मोहनलाल लुंकड शाळेतील हे द़ृश्य होते. या ठिकाणी सकाळच्या सत्रात गर्दी होती. मात्र, दुपारी बारा वाजल्यानंतर मतदान थंडावले होते.