Loksabha election | सहा हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात
पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत असणार्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. 13) मतदान होणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील मतदान केंद्रांवर आयुक्तालयाची पोलिस
यंत्रणा सज्ज झाली असून, तब्बल 6 हजार पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर तैनात असणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन, पथसंचलन तसेच मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. तब्बल सहा हजार पोलिसांचा फौजफाटा शहरात तैनात असणार आहे. एकंदरीतच निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसल्याचे चित्र दिसून येत आहे.
अडीच हजार पोलिस दाखल
पोलिस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्यांसह सहा उपायुक्त, 11 सहायक पोलिस आयुक्त, 325 अधिकारी (पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक), 4 हजार अंमलदार, 1500 होमगार्ड, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची सहा पथकांचा समावेश आहे. यातील अधिकारी कर्मचार्यांसह सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त शहराबाहेरून मागवण्यात आला आहे.
वाहतूक पोलिसही सज्ज
शहरात येणार्या रस्त्यांवर दहा महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त पोलिसांची विशेष पथकेही शहरात गस्तीवर असणार आहेत. गर्दी होणार्या किंवा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असणार्या केंद्रांवर पोलिस आणि वाहतूक पोलिसांचा विशेष बंदोबस्त असणार आहे. त्यासाठी वाहतूक विभाग सज्ज झाला आहे.
3 हजार जणांवर कारवाईची नोंद
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी समाजकंटकासह गुन्हेेगारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत तब्बल तीन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच, सात एमपीडीए तर सहा मोका कारवाईमध्ये 28 सराईतांना जेरबंद करण्यात आले आहे. 101 आरोपींकडून 111 शास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. 33 आरोपींकडून 33 पिस्तुलांसह 47 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अंमली पदार्थ तस्करांवरही कारवाईचा मोठा बडगा उगारण्यात आला असून 52 लाख 62 हजार रुपये किमतीचे 1 लाख 65 हजार लिटर मद्य जप्त करण्यात आले आहे. तसेच 56 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
नाकाबंदीत मिळाले घबाड
आचारसंहिता लागू झाल्यापासून नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी तब्बल 67 लाख 40 हजारांची रोकड जप्त केली आहे. तसेच, दीड कोटी रुपये किमतीचे 2 किलो 74 ग्रॅम सोने जप्त केल्याची नोंद आहे.
एकही मतदान केंद्र संवेदनशील नाही
निवडणूक आयोगाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील मतदान केंद्र जाहीर करण्यासाठी काही निकष दिले आहे. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात येणार्या मावळ आणि शिरूर मतदारसंघात एकही मतदान केंद्र संवेदनशील नाही, असे सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश माने यांनी ‘Bharat Live News Media’ शी बोलताना सांगितले.
निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस सज्ज झाले आहेत. दरम्यान, गैरप्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. नियंत्रण कक्षाला येणार्या प्रत्येक कॉलची गांभीर्याने दखल घेतली जाणार आहे. तसेच, सर्व नागरिक, कार्यकर्ते आणि राजकीय मंडळींनी नियमांचे पालन करून पोलिस व प्रशासनाला सहकार्य करावे.
– विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड
हेही वाचा
नागपूर: मध्यवर्ती कारागृहात कैद्याचा मृत्यू
Loksabha election | आ.प्रा. राम शिंदेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
जळगाव : अनिल भाईदास पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क