स्थानिक नेत्यांचे दुर्लक्ष : मतदानाची टक्केवारी घसरणार? अनेक ठिकाणी लक्ष्मीदर्शन

स्थानिक नेत्यांचे दुर्लक्ष : मतदानाची टक्केवारी घसरणार? अनेक ठिकाणी लक्ष्मीदर्शन

मांडवगण फराटा : Bharat Live News Media वृत्तसेवा :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी थंडावली असली तरी सोशल मीडियावर कार्यकर्त्यांमध्ये रविवारी (दि. 12) रात्री चांगलीच जुगलबंदी सुरू होती. या निवडणुकीमध्ये काही तालुक्यातील गावांमध्ये गावपातळीवरील राजकीय नेते मंडळींनी प्रचार केला नसून फक्त ज्येष्ठ नेता आला तरच या भागातील सर्वसामान्य जनतेच्या गाठी-भेटी घेऊन मतदान करा, असे आवाहन करण्यात येत होते. त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांपुढे आपण खरंच प्रचार करतोय असे स्थानिक पातळीवरील राजकीय नेते दाखवून देत श्रेय घेत असल्याचे चित्र दिसून येत होते. हवा तसा प्रचारच न झाल्याने मतदानाची आकडेवारी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लोकसभेच्या निवडणुकीमधील काही तालुक्यामध्ये तर ‘त्या पक्षाने एवढे दिले राव, तुम्ही लई कमी देताय हेदेखील मला नको’, ‘खासदाराकडे काही काम नसते आमच्या गरिबाचे’ अशा काही मतदारराजांच्या शब्दांनी काही ठिकाणी कार्यकर्त्यांची चांगलीच पळताभुई झाली. राजकीय नेतेमंडळीने काही तालुक्यांमध्ये मतदारांना जोरदार लक्ष्मीदर्शन घडविले आहे.
रात्रीच्या वेळी गाड्यांचा ताफा वेगवेगळ्या पद्धतीने गावागावात व शहरात दिसून येत होता. एका घरामध्ये एका पक्षाचे कार्यकर्ते तर दुसर्‍या घरामध्ये दुसर्‍या पक्षाचे कार्यकर्ते, त्यामुळे मतदारराजाची रात्री झोपच उडाली होती. काही कार्यकर्त्यांनी मतदारांची पैसे वाटण्याच्या यादीत नावे दिली, पण पैसे मात्र दिले नसल्यामुळे या यादीवरून काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ सुरूच होता. पैसे दिले तरच मतदान करणार असाही सूर काही ठिकाणी मतदारांमध्ये होता. वरून पैसे येतातच पण मधलेच नेतेमंडळी डल्ला मारून आपले नाव यादीला देतात, त्यामुळे पैसे घेतले म्हणून काय गैर झाले? असे म्हणणे काही मतदारांचे होते.
राजकीय नेते विकासाबाबत कायम आपल्याला आश्वासन देतात मग आपण राजकीय नेत्यांना एकदा मतदान करण्याचे आश्वासन दिले म्हणून काय बिघडले, जो चांगला नेता असेल त्या नेत्याला आम्ही मतदान करणार. त्याने पैसे वाटप करो अथवा न करो, त्यांना मतदान करणारच आहे, असाही सूर काही मतदारांमध्ये होता.
भरपावसात कार्यकर्त्यांचा आटापिटा
राजकीय नेते फक्त निवडणुकीपुरते दारात येतात, नाहीतर पुढच्या निवडणुकीलाच दारात दिसतात, आपले वैयक्तिक काम घेऊन गेले तर त्यांचा कार्यकर्ता घेऊन जावा लागतो तसेच दोन ते तीन दिवस भेटत नाहीत, भेटले तर तुझे काम नंतर करू, अशा आश्वासनांची खैरात करतात. त्यामध्येच गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस पडत असल्याने कार्यकत्यांना मतदारराजाला खुश करण्यासाठी चांगलाच आटापिटा करावा लागला. मतदाराला जे मागेल ते देण्यासाठी कार्यकर्ते सज्ज होते. रविवार असल्याने रात्री उशिरापर्यंत हॉटेलमध्येदेखील मोठ्या प्रमाणात गर्दी होती. निवडणुकीची प्रचार यंत्रणा थंडावली असली, तरी मात्र छुप्या पद्धतीने रात्रभर प्रचार सुरू होता.
हेही वाचा

जात प्रमाणपत्र खोटे तरीही विद्यार्थिनीची MBBS पदवी कायम!जाणून घ्‍या हायकोर्ट काय म्‍हणाले?
सिनेस्टाईल थरारनाट्य : पोहत पाठलाग करून दारू विक्रेत्याला पकडले
जळगाव : परिवाराकडून रक्षा खडसे यांनी आशिर्वाद घेत बजावला मतदानाचा हक्क