जलसंकट! आंबेगाव पठार परिसरात नागरिकांची पाण्यासाठी वणवण

धनकवडी : Bharat Live News Media वृत्तसेवा : उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असतानाच ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत सामान्य नागरिक पाणीटंचाई आणि उन्हाळ्यातील उष्णतेच्या झळांचा एकत्रित सामना करत आहेत. आंबेगाव पठार परिसर हा तसाही पाणीटंचाईचा सतत सामना करावा लागणारा भाग म्हणून ओळखला जातो आहे. अजूनही बहुतांश रहिवासी सोसायट्यांमध्ये महापालिकेतर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. काही भागांत दिवसाआड टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा होतोय. मागील दोन आठवड्यांपासून नागरिकांची पाण्यासाठी मागणी करताना ससेहोलपट होतेय.
धनकवडीलगतच्या दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, सर्व्हे नंबर 15 आणि सर्व्हे नंबर 16 या आंबेगाव बुद्रुक पठार, सिंहगड कॉलेज रोड परिसर, शिवसृष्टी मागील भिंताडेनगर, चंद्रांगण व इतर सोसायट्या या भागातील नागरिकांना मात्र अद्यापही पुरेशा दाबाने आणि सुरळीत पाणीपुरवठा करण्यात स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी यशस्वी झालेे नाहीत. धनकवडी लगतच नव्याने विकसित होत असलेल्या या भागात मोठ्या प्रमाणावर नवीन बांधकामे उभी राहत आहेत.
नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येथे पाणी समस्या एक ज्वलंत प्रश्न आहे. भिंताडेनगरमधील आठ ते दहा सोसायट्या तसेच चंद्रांगण व कपिल या मोठ्या रहिवासी सोसायट्यांसह काही ठिकाणी पद्मावती पंपिंग स्टेशनमधून टँकरने पाणीपुरवठा होतो. शिवसृष्टी, सिंहगड कॉलेज, चिंतामणी ज्ञानपीठलगतच्या रहिवासी सोसायटीतदेखील पाणी समस्या आहे. या परिसरात सदनिकांची संख्या मोठी आहे. पद्मावती पाणीपुरवठा केंद्रातून या परिसरासाठी सुमारे 116 ते 120 पाण्याच्या टँकरच्या खेपा होत आहेत.
आंबेगाव पठार परिसरातील 15 नंबर, 16 नंबर परिसरातील चंद्रांगण सोसायटीसह इतर सोसायट्या, शिवसृष्टीलगत असलेल्या भिंताडेनगर परिसराला उन्हाळ्याच्या तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या परिसरात काही ठिकाणी दिवसाआड आणि कमी प्रमाणात पाणीपुरवठा टँकरने होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी पाणीपुरवठा टँकरच्या खेपा अधिक वाढवाव्यात, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
– सुनील लेकावळे, गणेश विश्व, भिंताडेनगर.
आंबेगाव पठार परिसरातील सर्व्हे नंबर 15 16 या परिसरासाठी पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. लवकरच हे काम झाल्यावर पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. त्यानंतर नागरिकांना पायपीट करावी लागणार नाही.
– संदीप मिसाळ, शाखा अभियंता, स्वारगेट पाणीपुरवठा विभाग.
हेही वाचा
कृषीचा पतआराखडा निश्चित; 87 हजार 954 कोटींची तरतूद
जाहीरनाम्यांमधील आरोग्य घोषणा, केवळ आश्वासनांचे फुगे? नागरिकांकडून प्रश्न उपस्थित
Loksabha election | तो प्रकार खूपच दुर्दैवी! पैसे वाटपाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
