Hello!! नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमधून बोलतोय! असे काॅल्स तुम्हालाही येताय? सावध व्हा!

पुणे : हॅलो… मी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, मुंबई क्राइम ब्रँचमधून बोलतोय… तुमच्याविरुद्ध अमली पदार्थ आणि मनीलॉन्ड्रिंगसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात येतोय… तुम्ही फेडेक्स कुरिअरच्या माध्यमातून पाठविलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ मिळून आले आहेत. तसेच, तुमच्या बँक खात्याद्वारे मनीलॉन्ड्रिंग झाली आहे. तुमची चौकशी करायची आहे. अन्यथा, तुम्हाला हे प्रकरण खूप महागात पडेल, असे फोनद्वारे जर तुम्हाला कोणी धमकावत …

Hello!! नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमधून बोलतोय! असे काॅल्स तुम्हालाही येताय? सावध व्हा!

अशोक मोराळे

पुणे : हॅलो… मी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, मुंबई क्राइम ब्रँचमधून बोलतोय… तुमच्याविरुद्ध अमली पदार्थ आणि मनीलॉन्ड्रिंगसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात येतोय… तुम्ही फेडेक्स कुरिअरच्या माध्यमातून पाठविलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ मिळून आले आहेत. तसेच, तुमच्या बँक खात्याद्वारे मनीलॉन्ड्रिंग झाली आहे. तुमची चौकशी करायची आहे. अन्यथा, तुम्हाला हे प्रकरण खूप महागात पडेल, असे फोनद्वारे जर तुम्हाला कोणी धमकावत असेल तर वेळीच सावध व्हा… कारण, ते दुसरे-तिसरे कोणी नसून, सायबर ठगांनी तुम्हाला लुटण्यासाठी लावलेला सापळा आहे.

सायबर ठगांनी देशात शेअर मार्केट आणि फेडेक्स कुरिअर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो फ्राॅडद्वारे धुमाकूळ घातला आहे. नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांवर सायबर ठग ऑनलाईन दरोडा टाकून काही तासांत रोकड लंपास करत आहेत. चार महिन्यांत पुण्यात 31 नागरिकांना ठगांनी फेडेक्स कुरिअर फ्राॅडद्वारे सात कोटी 68 लाख 71 हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी आत्तापर्यंत सायबर पोलिस ठाणे आणि विविध स्थानिक पोलिस ठाण्यात 29 गुन्हे दाखल  करण्यात आले आहेत. मागील वर्षी फेडेक्स कुरिअर फ्राॅडचे नऊ गुन्हे दाखल होते. तर चालू वर्षातील चार महिन्यांत हे प्रमाण तिप्पट झाले आहे. देशातून या फ्राॅडद्वारे लुटलेला सर्व पैसा बिटकॉईनच्या माध्यमातून परदेशात पाठवला जातो.

फेडेक्स कुरिअरद्वारे आलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याची भीती दाखवून नागरिकांकडून पैसे उकळले जात आहेत. चार महिन्यांत असे 29 गुन्हे दाखल आहेत. थोडीशी खबरदारी अन् प्रसंगावधान राखले, तर ही फसवणूक टाळता येऊ शकते. नागरिकांनी आपण पार्सलच पाठवले नाही तर घाबरून जावून नये. स्काईपद्वारे पोलिस अशी कोणतीही चौकशी करत नाहीत.

– मीनल सुपे-पाटील, पोलिस निरीक्षक, सायबर

असे अडकवले जाते जाळ्यात…

सुरुवातीला तुम्हाला फेडेक्स कुरिअरमधून बोलतोय, असा फोन येतो.
तुमच्या नावाने तैवान, कुवेत, इराण, इराकमधून पार्सल आले आहे किंवा तुम्ही पाठवले आहे, असे सांगितले जाते.
पुढे तुमच्या पार्सलमध्ये तीन-चार पासपोर्ट, अमली पदार्थ, कपडे आढळून आले आहेत.
त्यानंतर तुम्हाला लगेच मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमधून बोलतोय, तुमच्या पार्सलमध्ये अमली पदार्थ आढळून आल्यामुळे तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येतोय, असा दम भरला जातो.
तुम्ही घाबरून जाता, कारण सायबर ठगाने अगोदरच तुमची काही माहिती मिळवलेली असते, तो जे सांगतो त्यामुळे तुमचा विश्वास बसतो आणि तुम्ही जाळ्यात अडकता.
मुंबई क्राईम ब्रॅंचच्या अधिकार्‍याचे नाव वापरून सायबर ठगाचा दुसरा साथीदार तुमच्याशी बोलतो. जर तुम्ही असे काही केले नसेल, तर तुमची चौकशी आम्हाला करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला आम्ही एक ऑलनाईन स्काईपची लिंक पाठवतो ती तुम्ही जॉईन करा.
अगोदरच तुम्ही घाबरलेले असता, शिवाय त्यांच्याकडून हा तपास फार गोपनीय आहे, कोणाला याबाबत वाच्यता करू नका नाहीतर तेदेखील अडचणीत येतील, अशी भीती दाखवली जाते.
तुम्ही स्काईप ओपन करता, तसे तुम्हाला समोरील व्यक्ती क्राईम ब्रॅंचचा अधिकारी असल्याचे ओळखपत्र दाखवतो. तुम्ही त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवता आणि तो सांगेल त्याप्रमाणे गोपनीय माहिती देता.
एकदा का तुम्ही त्यांच्या टप्प्यात आले की, तुमच्या बँक खात्यातील पैशांची पडताळणी करावी लागेल, असे सांगून ते पैसे काढून घेतात. या वेळी चौकशी पूर्ण झाल्यानंतर ते पैसे तुम्हाला परत करतील, असे सांगतात. तुम्ही सर्व खात्यावरील पैसे पडताळणीच्या नावाखाली ठगांकडे देता.
जेव्हा पैसे परत मिळत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर तुम्हाला समजते की, आपली फसवणूक झाली आहे. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

अशी टाळू शकता फसवणूक…

प्रलोभनापासून दूर राहा.
सायबर ठग तुम्हाला घाबरवतात, त्यासाठी आलेल्या कॉलची न भीता खात्री करा, असे काही वाटले तर पोलिसांशी संपर्क करा.
सर्व प्रथम तुम्ही पार्सल पाठवले आहे की नाही, याची पडताळणी करा. एखाद्याने तुमच्या नावे पार्सल पाठवले असेल आणि समोरील व्यक्ती त्यामध्ये अमली पदार्थ आहेत, असे सांगत असेल तर घाबरू नका.
स्काईपद्वारे सध्यातरी पोलिस किंवा नार्कोटिक्स ब्युरो अचानक फोन करून तुमची चौकशी करत नाहीत. तुम्ही जर असा मोठा गुन्हा केला तर ते थेट तुम्हाल घरी येऊन चौकशीसाठी ताब्यात घेतील. त्यामुळे स्काईप चौकशीवर विश्वास ठेवून नका.
मनीलॉन्ड्रिंगच्या गुन्ह्याची भीती दाखवली तरी तुम्ही तुमच्या बँक खात्याची माहिती देऊ नका. ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करण्याचे टाळा.
थोडीशी खबरदारी अन्  प्रसंगावधान दाखवले तर तुम्ही फसवणूक टाळू शकता.

हेही वाचा

शिक्षिकेला फेसबुकप्रेम पडले महागात..! ३०.९६ लाखांचा गंडा
अखेर पुणे स्थानकावरील लिफ्टसाठी चार जागा निश्चित..!
कोल्हापूर : जिल्ह्यात चार अपघातांत सहाजण ठार