
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
अक्षयतृतीयेनिमित्त घराघरात पूर्वजांच्या नावाने घागरी भरून विधीवत पूजा करून पितरांना भोजन देण्याची प्रथा असल्याने, त्याचे साहित्य शहरातील मुख्य बाजारपेठेसह उपनगरांमधील बाजारात उपलब्ध झाले असून, ते खरेदीसाठी ग्राहकांकडून गर्दी केली जात आहे. त्याव्यतिरिक्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या सणाला सोने-चांदी, वाहने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कपडे, भांडी खरेदीचा योगा आवर्जून साधला जात असल्याने, सध्या बाजारपेठांना झळाळी मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वीच गुढीपाडवा साजरा करण्यात आला. गुढीपाडव्याला देखील खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र, यादिवशी सोन्या-चांदीचे दर अधिक असल्याने, ग्राहकांनी खरेदीबाबत आखडता हात घेतला. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर झपाट्याने कमी होत असल्याने, अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. त्याव्यतिरिक्त गृहोपयोगी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारात देखील मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. विक्रेत्यांच्या मते, गेल्या काही दिवसांपासून बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढली असून, गृहपयोगी वस्तू खरेदीचा धडाका सुरू आहे. उन्हाळा असल्याने एसी, कुलर, फ्रिज आदींना मोठी मागणी आहेे. विक्रेत्यांनी ऑफर्स उपलब्ध करून दिल्याने, मोबाइल, लॅपटॉप, कॅमेरा आदी वस्तूंची मागणी वाढली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी हक्काचे घर घेण्याकडेही अनेकांचा कल असतो. सध्या नाशिक व परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम प्रकल्प सुरू असून, बहुतांश ठिकाणी रेडीपझेशन घरे उपलब्ध आहेत. ग्राहकांकडून सध्या साइट व्हिजिट केल्या जात असून, सणाच्या मुहूर्तावर बुकींग करण्याचे अनेकांचे नियोजन आहे. वाहन बाजारात देखील ग्राहकांची वर्दळ वाढल्याने, विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, पूजेच्या साहित्यांपासून ते घरांच्या खरेदीपर्यंतचा मुहूर्त अक्षयतृतीयेला साधला जात असल्याने, सध्या बाजारात चैतन्याचे वातावरण बघावयास मिळत आहे.
Akshay Tritiya 2024 | अक्षय तृतीया शुक्रवारी, जाणून घ्या शुभमुहूर्त आणि पूजाविधी
आंबा खातोय भाव
पितर भोजणात आमरस करण्याची प्रथा असल्याने, सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात आंबा विक्रीस आणला आहे. रत्नागिरीचा हापूस, केसर, बादाम आंबा बाजारात दाखल झाला असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत आंब्यांच्या दरात ३० टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अक्षयतृतीयापर्यंत नाशिकच्या बाजारात आंब्याच्या किंमती बऱ्यापैकी कमी झालेल्या असतात. मात्र, यावेळेस आंब्यांच्या किंमती कमी झाल्या नसून, त्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. केसर व बदाम आंबा १०० ते २०० रुपये किलोने विकला जात आहे. रत्नागिरीचा हापूस ८०० ते १२०० रुपये डझन असून, २५० ते ३०० रुपये किलोने विकला जात आहे.
हेही वाचा:
मतांच्या टक्कावाढीसाठी ‘सहकार’ रिंगणात; पुणे, शिरूर, मावळ लोकसभा मतदानासाठी समन्वयाने काम करणार
J&K | कुलगाममधील चकमकीत ३ दहशतवादी ठार, ४० तास चालले सर्च ऑपरेशन
MPSC| अखेर ठरलं! राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार; एमपीएससीकडून ‘ही’ तारीख जाहीर
