कोल्हापूर : ऊस आंदोलनाला हिंसक वळण

कोल्हापूर : ऊस आंदोलनाला हिंसक वळण

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या ऊस दराबाबतचे आंदोलन दिवसेंदिवस हिंसक बनत चालले आहे. ऐन दिवाळीत सोमवारी काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. उसाची वाहतूक करणारी वाहने तसेच ऊस तोडणी बंद पाडण्याचे प्रकारही वाढू लागले आहेत. यामुळे त्याचा परिणाम यावर्षीच्या गळीत हंगामावर होत आहे.
गेल्या वर्षीच्या उसाला प्रतिटन 400 रुपये भाव द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू केले आहे. त्यानंतर झालेल्या ऊस परिषदेत उसाला एफआरपीप्रमाणे 3500 रुपये भाव मिळावा, अशी मागणी करत 3500 रुपये द्या आणि कोयता लावा, अशी घोषणा करण्यात आली. दरम्यानच्या काळात अनेक साखर कारखान्यांनी आपले दर जाहीर करत गळीत हंगामास सुरुवात केली. यामध्ये जास्तीत जास्त कारखान्यांनी 3200 रुपयांच्या आतच दर जाहीर केले आहेत. केवळ एकाच कारखाने 3 हजार 200 रुपये दर जाहीर केला आहे. याशिवाय साखर कारखाने आता गेल्या वर्षीच्या तोड झालेल्या उसाला 400 रुपये देणे शक्य नसल्याचे मत बोलून दाखवू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने आंदोलन हिंसक बनू लागले आहे. जाळपोळ, ऊस वाहतूक करणारी वाहने अडविणे, त्याची मोडतोड करणे, ऊसतोड बंद पाडणे असे प्रकार आता गावोगावी सुरू झाले आहेत. काही कारखाने पोलिस बंदोबस्तात उसाची वाहतूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. तीदेखील वाहने अडविली जात आहेत.
अकिवाटला बैलगाड्या पेटविल्या
कुरुंदवाड : दिवाळीनंतर पुन्हा एकदा ऊस दरासाठी शेतकरी संघटना रस्त्यावर आली आहे. शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे ऊस बैलगाड्या पेटवल्या तर टाकळीवाडी येथे सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास उसाने भरलेल्या बैलगाड्या पलटी केल्या. शेतकरी, कारखाना समर्थक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांत हाणामारीही झाली. टाकळीवाडी येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली.
कारखाना समर्थक – आंदोलकांत हाणामारी
कारखाना समर्थक शेतकरी आणि आंदोलक हे एकत्र भिडल्याने त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही गट बाजूला केले. तब्बल दोन तास चाललेल्या या आंदोलनात संघटनेचे सावकार मादनाईक यांनी कारखाना प्रशासनाने ऊसदर जाहीर केल्याशिवाय कारखाना चालू करू नये, अशी मागणी लावून धरल्याने अखेर कारखानदारांनी ऐन दिवाळीत कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतल्याने स्वाभिमानीने आपले आंदोलन स्थगित केले. टाकळीवाडी येथे तणावपूर्ण वातावरण असल्याने जिल्ह्यातील राखीव पोलिस कुमक लावण्यात आली असून पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी कारखानदार आणि आंदोलकांत मध्यस्थी केली.
कारखाना समर्थक बाबासाहेब वनकुरे घटनास्थळी आले असता संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. यावेळी कारखाना समर्थक आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांत चांगलीच झटापट झाली. स.पो.नि. रविराज फडणीस यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल होऊन हस्तक्षेप करत दोन्ही गट बाजूला केले. आक्रमक झालेल्या छत्रपती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टाकळीवाडी रस्त्यावर ठिय्या मारून जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. यावेळी स्वाभिमानीचे सावकार मादनाईक, सागर शंभूशेटे, विश्वास बालिघाटे यांनी ऊस दर जाहीर झाल्याशिवाय ऊसतोड आणि ऊस वाहतूक करू द्यायची नाही. ज्या ठिकाणी ऊसतोड सुरू आहे ती बंद पाडा, असा आदेश दिला. शिरोळ तालुक्यातील काही कारखानदार प्रतिनिधींनी भेट देऊन जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत ऊसतोड करणार नाही, असे सांगितल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठिय्या आंदोलन स्थगित केले.
कवठेसारमध्ये उसाच्या तोडी बंद पाडल्या
दानोळी : कवठेसार (ता. शिरोळ) येथे सुरू असलेल्या ऊसतोड स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडल्या. कोणत्याही परिस्थितीत मागील हप्ता घेतल्याशिवाय ऊसतोड सुरू करू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानीतर्फे देण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष रामचंद्र शिंदे, भरत माणगावे, विशाल खिलारे, जनगोंडा पाटील, गोटू गाडवे, सुरेश पाटील, दादुषा फकीर, राजू तेरदाळे, दादा चौगुले उपस्थित होते.
दालमियाची ऊस वाहतूक रोखली
माजगाव : येथे दत्त दालमिया साखर कारखान्यांकडे ऊस वाहतूक करणारे दहा ते बारा ट्रॅक्टर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवले. एका ट्रॅक्टरचे हेडलाईट फोडून ट्रॉलीच्या टायरमधील हवा सोडली. यामध्ये ट्रॅक्टरचे किरकोळ नुकसान झाले. काही वेळातच घटनास्थळी पोलिस फौजफाटा व कारखान्याचे कर्मचारी दाखल झाले. पोलिसांनी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर बंदोबस्तात दालमिया साखर कारखान्याकडे नेले.
‘विश्वास’चा ऊस रोखला
मलकापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शाहूवाडी तालुक्यात ऊसतोडी रोखल्या. विश्वास सहकारी साखर कारखान्याला जाणार्‍या दहा उसाच्या ट्रॉल्या अडवून आपला तीव्र संताप व्यक्त केला.
यावेळी राजू केसरे, संजय पाटील, बाजीराव पाटील, भारत पाटील, प्रकाश कांबळे, बळी पाटील, हरी पाटील, सुभाष पाटील उपस्थित होते.
ट्रॅक्टरचे टायर्स जाळले
किणी : सावर्डे, ता. हातकणंगले येथून ऊस भरून वारणा कारखान्याकडे निघालेला ट्रॅक्टर मध्यरात्री बाराच्या सुमारास तळसंदेजवळ आला असता अज्ञात दहा ते बारा जणांनी तो अडविला. चालक अतुल शिवराज आंबटवाड (रा. आलेगाव, ता. कंधार, जि.नांदेड) यांच्याकडून ट्रॅक्टरच्या चाव्या व मोबाईल काढून घेण्यात आला. त्यांनतर दगडफेक करत ट्रॅक्टरचे हेडलाईट फोडण्यात आले. तसेच चालकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. पंक्चर काढण्यासाठी वापरण्यात येणारे सोल्युशन ओतून चारही टायर्स जाळण्यात आल्या. याबाबतची फिर्याद चालकाने वडगाव पोलिसांत दिल्याने अज्ञात दहा ते बारा लोकांविरुद्ध वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
The post कोल्हापूर : ऊस आंदोलनाला हिंसक वळण appeared first on पुढारी.

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या ऊस दराबाबतचे आंदोलन दिवसेंदिवस हिंसक बनत चालले आहे. ऐन दिवाळीत सोमवारी काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. उसाची वाहतूक करणारी वाहने तसेच ऊस तोडणी बंद पाडण्याचे प्रकारही वाढू लागले आहेत. यामुळे त्याचा परिणाम यावर्षीच्या गळीत हंगामावर होत आहे. गेल्या वर्षीच्या उसाला प्रतिटन 400 रुपये भाव द्यावा, या मागणीसाठी …

The post कोल्हापूर : ऊस आंदोलनाला हिंसक वळण appeared first on पुढारी.

Go to Source