नागपूर झोन सुरक्षितच! भूकंपामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये : जिल्हाधिकारी डॉ. इटनकर

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून कमी तीव्रतेच्या भूकंपाची नोंद होत आहे. भारतीय भुवैज्ञानिक सर्वेक्षण (Geological Survey of India) विभागानुसार नागपूर जिल्ह्यातील भूकंप हे अतिशय सौम्य प्रकारचे भूकंप आहेत. यातून कोणतीही हानी होणार नसल्याने नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बुधवारी (दि.८) केले.
तसेच मार्च व मे महिन्यात सौम्य भुकंपाच्या थोड्या फार फरकाने होणाऱ्या नोंदीमुळे संपूर्ण नागपूर जिल्ह्याची सुक्ष्म भूकंप तपासणी व अभ्यास (Micro Earthquake Investigation & Study) करण्यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला विनंती करण्यात आली असल्याचीही माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रे (National Center for Seismology) या पोर्टलवर नागपूर जिल्ह्यात मार्च महिन्यापासून एकूण ९ भूकंप तर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात २ भूकंपाची नोंद करण्यात आलेली आहे. या भुकंपाची तीव्रता अत्यल्प २ ते २.८ रिक्टर स्केलमध्ये असल्याने या भुकंपाचे धक्के नागरिकांना जाणवलेले नाहीत. या भुकंपामुळे कोणतीही हानी झालेली नाही. भूकंप प्रवणतेनुसार भारताचे ४ भूकंप क्षेत्रात वर्गीकरण करण्यात आलेले आहे. सिसमिक झोन (Seismic Zone) II, III, IV व V असे वर्गीकरण असून नागपूर जिल्हा हा झोन ।। भूकंप क्षेत्रात मोडल्या जातो. हा झोन सर्वात कमी सक्रिय क्षेत्र असल्याने भुकंपाच्या दृष्टीने इतर झोनच्या तुलनेत सुरक्षित झोन म्हणून ओळखला जातो. यामुळेच जिल्ह्यातील नागरिकांनी यासंबंधी अभ्यास केला जाणार असल्याने घाबरण्याची गरज नसून सावधगिरी म्हणून थोडी खबरदारी घ्यावी, अधिक माहितीकरीता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी ०७१२-२५६२६६८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
हेही वाचा :
नागपूर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; तज्ज्ञ करणार अभ्यास
नागपुरात भूकंपाचे सौम्य धक्के!
नागपूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के
