अपहरण प्रकरणी एचडी रेवन्ना यांना १४ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अपहरण प्रकरणी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे पुत्र आणि जनता दल धर्मनिरपेक्ष ( जेडी(एस) पक्षाचे नेते एचडी रेवन्ना यांना १४ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. केआर नगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या अपहरणाच्या गुन्ह्यात ४ मे रोजी विशेष तपास पथकाने ( एसआयटी) रेवण्णा यांना अटक केली होती.
आज एचडी रेवण्णा यांना न्यायालयासमाेर हजर करण्यात आले. यावेळी त्यांना १४ मे पर्यंत न्यायालयीन काेठडी सुनावण्यात आली.
JD(S) leader HD Revanna sent to judicial custody till 14th May
He was arrested on May 4 by SIT officials in a kidnapping case registered against him at KR Nagar police station in the city.
— ANI (@ANI) May 8, 2024
सेक्स स्कँडल प्रकरणाच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ स्थापन
एचडी रेवन्ना यांचे पुत्र प्रज्वल रेवन्ना यांचे महिलांसह आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडीओ व्हायरल झाले. महिलांवर दबाव आणून त्यांचा लैंगिक छळ करण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पीडितांमध्ये काही शासकीय कर्मचारी असल्याचेही सांगण्यात येते. यानंतर कर्नाटक राज्य महिला आयोगाने २६ एप्रिल रोजी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. विशेष तपास पथक नेमावे, असेही राज्य सरकारला सुचविले होते. त्यानंतर प्रकरणाच्या चौकशीसाठी कर्नाटक सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. दरम्यान, प्रज्वल रेवन्ना यांचा सहभाग असलेल्या कथित सेक्स स्कँडल प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बी. के. सिंग यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडे एफआयआर पाठवण्यात आला आहे.राष्ट्रीय महिला आयोगाने सोशल मीडियावर असंख्य आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
मला सरकारी अधिकाऱ्यांसह महिलांचे सुमारे ३ हजार व्हिडिओ असलेले पेन ड्राइव्ह मिळाले असल्याचा दावा कर्नाटकमधील एका भाजप नेत्याने केला होता. याबाबत त्यांनी डिसेंबर २०२३ मध्ये राज्याच्या पक्षाध्यक्षांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू तसेच कर्नाटकातील हसन लोकसभा खासदार आणि जेडीएसचे (जनता दल सेक्युलर) उमेदवार प्रज्ज्वल रेवन्ना यांच्याविरोधात लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला होता. या फुटेजचा वापर महिलांना ब्लॅकमेल करून त्यांना सतत लैंगिक कृत्यांमध्ये गुंतण्यासाठी केला असल्याचाही आरोप प्रज्वल रेवन्ना यांच्यावर करण्यात आला आहे.
प्रज्वल रेवन्ना JD(S) मधून निलंबित
प्रज्वल रेवन्ना हे हसन लोकसभा मतदारसंघातील एनडीएचे उमेदवार आहेत. येथे गेल्या शुक्रवारी मतदान पार पडले. काही आक्षेपार्ह व्हिडिओंवरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी प्रज्वल रेवन्ना यांना JD(S) मधून निलंबित करण्यात आले. दरम्यान, एच.डी. रेवन्ना यांनी त्यांचा मुलगा प्रज्वल आणि ते स्वत: त्यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांच्या चौकशीसाठी तयार आहेत आणि आरोप सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कारवाईला सामोरे जाऊ, असे त्यांनी स्पष्ट केले होते.