नागपूर : गरम भाजी न वाढल्याने पतीने उचलले टोकाचे पाऊल!
नागपूर ; Bharat Live News Media वृत्तसेवा हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात रागाच्या भरात कुणाचे कधी काय होईल हे काही सांगता येत नाही. आता हेच पाहा ना, पत्नीनं जेवणात गरम भाजी न वाढल्यानं नाराज झालेल्या पती रागाच्या भरात पत्नी आणि मुलांना घराबाहेर काढले अन् स्वतः गळफास घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पण नागपूर पोलिसांच्या तत्परतेमुळे त्याचा हा डाव फसला.
शहरातील पाचपावली पोलीस स्टेशनचे बीट मार्शल पोलीस अंमलदार अतुल व मनोज हे सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ठक्करग्राम भागात पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान एका महिलेने ११२ या क्रमांकावरून पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. लष्करी बागेतील एका तरुणाने दारूच्या नशेत पत्नी आणि मुलांना मारहाण करत घराबाहेर काढल्याचं महिलेने पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. संदेश प्राप्त होताच बिटमार्शल्सने ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांना कळवली. पोलीस स्टेशन हद्दीतील इतर बीट मार्शल पोलीस अमलदार देवेंद्र व प्रफुल यांना देखील लष्करी बाग येथे जाण्यासाठी सूचना देत स्वत:ही घटनास्थळी पोहोचले.
बीटमार्शल अतुल आणि मनोज दाखल झाले तेव्हा लोकांची गर्दी झाली होती. बीट मार्शल्स यांनी घराबाहेर काढलेल्या महिलेची विचारपूस केली. तिने पती दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले. शेवटी इतरही सहकाऱ्यांच्या मदतीने दार तोडून पाहिले तर पंख्याला लटकलेला तरुण दिसला. अंधारात महिलेचा पती जीवन संपवण्याचा प्रयत्न करत होता. बीट मार्शल प्रफुल आणि देवेंद्र यांनी त्या व्यक्तीचे पाय पकडले आणि अतुल यांनी खाली उतरवत त्याची सुटका केली.
पोलीस आयुक्तांनी केले तत्पर बिट मार्शल्सचे कौतुक
दरम्यान, या घटनेनंतर त्या तरुणासह पत्नीने तक्रार देण्यास नकार दिला. दुसरीकडे या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी पोलीस स्टेशन पाचपावलीचे बीट मार्शल अतुल, मनोज, देवेंद्र व प्रफुल यांच्या कार्याची दखल घेतलेली आहे. पोलीस आयुक्तांनी त्यांना कार्यालयात बोलवून त्यांच्या कार्याबद्दल सन्मानित केले.
हेही वाचा :
अनाथ मुलाची नेपाळ ते नागपूर भटकंती; पोलिसदादाच्या भेटीने गवसली जगण्याची दिशा
Maharashtra Election | पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर, १० जूनला मतदान
माझी आई माझ्याबरोबर; तिचा मला आशीर्वाद : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मतदानानंतर वक्तव्य