पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : मतदान केंद्रच घरी पोहोचले अन् 88 वर्षे वय असलेल्या लीला भट यांना घरीच मतदानाचा अधिकार बजावता आला. वयोमानामुळे मागील वर्षी त्यांना मतदान करता आले नाही. पण, यंदा घरीच मतदान करता आल्याने त्या आनंदी होत्या. मतदान केल्याचे समाधान त्यांच्या चेहर्यावर होते अन् बोटाला लावलेल्या शाईचा हात दाखवत त्यांनी आनंदही व्यक्त केला.
निवडणूक आयोगाकडून 85 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी घरातूनच मतदान (होम वोटिंग) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याअंतर्गत सोमवारी (दि. 6) लीला भट यांच्याप्रमाणे शिवाजीनगर येथे राहणार्या काही ज्येष्ठांनीही मतदान केले. वयोमानामुळे, आजारपणामुळे किंवा दिव्यांगत्वामुळे ज्या 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत येणे शक्य नाही, अशा ज्येष्ठांसाठी निवडणूक आयोगातर्फे घरातूनच मतदानाची (होम वोंटिगची) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. लोकसभा निवडणुकीमध्ये पुण्यात विविध ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, याची सुरुवात सोमवारपासून (दि. 6) झाली. सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत ज्येष्ठांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली. शिवाजीनगर भागातील भांडारकर रस्ता, प्रभात रस्त्यासह ठिकठिकाणी अशा पद्धतीने ज्येष्ठांना घरीच मतदान करता आले.
निवडणूक अधिकारी, पोलिस, व्हिडीओग्राफर अशी काही जणांची टीम टप्प्याटप्प्याने ज्या ज्येष्ठ नागरिकांनी या सुविधेसाठी नोंदणी केली होती त्यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर त्या ज्येष्ठांच्या घरी मतदानासाठीची संपूर्ण यंत्रणा उभी करण्यात आली. शिवाजीनगर भागात जवळपास 40 हून अधिक ज्येष्ठांनी घरीच मतदान केले, तर काही दिव्यांग व्यक्तींनीही मतदान केले. मंगळवारी आणि बुधवारीही ज्येष्ठांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लीला भट म्हणाल्या, गेल्या वर्षी मतदान करता आले नाही. वयोमानामुळे ते शक्य झाले नाही. पण, मतदान यंत्रणा घरीच पोहोचल्यामुळे मतदानाचा अधिकार बजावता आल्याचा आनंद आहे. लीला भट यांचे पुत्र राजेश भट यांनीही आनंद व्यक्त केला.
हेही वाचा
रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत ३३.९१ टक्के मतदान
वक्फ बोर्डाचा मोक्याचा भूखंड बळकावला; एमआयएम उमेदवार अनिस सुंडकेंचा आरोप
राधानगरी: फेजीवडे, सरवडे मतदान केंद्रावर नावीन्यपूर्ण थीम