लोकसभा निवडणुकीनंतर दोन पक्ष संपणार : पृथ्वीराज चव्हाण
मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सहा पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकलेले आहेत. तीन पक्ष एका बाजूला तर इतर तीन पक्ष दुसर्या बाजूला आहेत. मात्र, निवडणुकीनंतर या सहा पक्षांपैकी दोन पक्ष लोप पावणार, संपुष्टात येणार, असे भाकीत काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. त्यांच्या भाकितामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्याकडे रोख असल्याची चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात होती.
पृथ्वीराज चव्हाणांचे नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. यंदाच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या विरोधात एक सुप्त लाट आहे. जसजसे टप्पे वाढत जातील तसतशी ही सुप्त लाट उघड व्हायला लागली आहे. विशेष म्हणजे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल अशा प्रकारे निकाल लागेल. पण जेव्हा अंतिम निकाल लागेल तेव्हा आता अस्तित्वात असलेल्या सहा पक्षांपैकी किमान दोन पक्ष तरी संपुष्टात येतील. हे पक्ष कुठेतरी विलीन होतील किंवा त्यातली माणसे दुसरीकडे जातील. पण दोन पक्ष दिसणार नाहीत, असा ठाम दावाही त्यांनी केला. त्यांच्या दाव्यामुळे हे दोन पक्ष कोण, याबाबत तर्कवितर्क काढले जात होते.
महाविकास आघाडीलाच बहुमत
देशात जीएसटी, महागाई, बेरोजगारी हे लोकांच्या जीवनाशी निगडित प्रश्न आहेत. निवडणुकीत हे मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, भ्रष्टाचार, त्याचा पुढे होणारा त्रास, संविधानाला असलेला धोका हे ते मुद्दे आहेत. पण या निवडणुकीत काय करायचे याचा निर्णय लोकांनी घेतलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला बहुमत मिळणार आहे. 25 हून अधिक जागा मिळतील. पण सध्याची परिस्थिती पाहता अनपेक्षित निकाल लागेल, असा दावाही चव्हाण यांनी केला.
मोदींना पराभव डोळ्यांसमोर दिसतोय
देशात मोदी नकोत, अशी सुप्त लाट असल्यानेच मोदींची तारांबळ उडाली आहे. ते गोंधळलेले असून पराभव त्यांच्या डोळ्यांसमोर दिसत आहे, अशी टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. मोदी 400 पारचा नारा देत आहेत. पण त्यांचे निर्विवाद बहुमत येणार असेल तर तुम्ही काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चौकशी का करत आहात? असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नसलेले विषय घेऊन मोदी बोलत आहेत. दहा वर्षे सत्तेत असूनही ते आपल्या कामगिरीचा आढावा घेत नाही आहेत. दहा वर्षांत जी आश्वासने पूर्ण करू शकलो नाही, ती पूर्ण करणार का, त्याबद्दलही मोदी काहीच बोलत नाहीत. भाजपाच्या जाहीरनाम्याबाबतही मोदी चकार शब्दही काढत नाहीत, असा चिमटाही चव्हाण यांनी काढला.
हेही वाचा
चुकीची माहिती देऊन टाकली जाते भुरळ : पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप
Lok Sabha Election 2024 : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सातार्यातून लढणार
Loksabha Election | ते आम्हाला हात बांधून कबड्डी खेळायला सांगताहेत; पृथ्वीराज चव्हाण
पहा व्हिडिओ : पृथ्वीराज चव्हाणांचा भाजप आणि मोदींवर निशाणा