अरविंद लव्हली यांचा राजीनामा; ‘इंडिया’च्या फुग्याला टाचणी
उमेश चतुर्वेदी
युद्धाला नुकतेच तोंड फुटलेले असताना थेट सेनापतीनेच शस्त्रे म्यान केली, तर खळबळ उडणे स्वाभाविकच. नेमका तसाच प्रकार दिल्ली काँग्रेसमध्ये घडला आहे. राजधानीत आम आदमी पक्षाशी आघाडी करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला खरा. तथापि, आता तोच निर्णय त्या पक्षावर बुमरँग होत चालला आहे. याचे कारण म्हणजे, ऐन निवडणुकीच्या धामधुमीत दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदसिंह लव्हली यांचा राजीनामा. याचा फटका विरोधी इंडिया आघाडीला बसणार, हेही उघड आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ज्या पक्षाचे अर्धे मंत्रिमंडळ तुरुंगात आहे, त्या पक्षासोबत युती कशासाठी, असा सवाल दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदसिंह लव्हली यांनी आपल्या राजीनामापत्रात उपस्थित केला आहे. त्यांच्या या कृतीमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे सरचिटणीस दीपक बाबरिया यांनी माझ्या कामात हस्तक्षेप केल्यामुळे मी राजीनामा दिला, असे लव्हली यांनी सांगितले असले, तरी मूळ कारण वेगळेच आहे. ते म्हणजे लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाशी काँग्रेसने केलेली युती. दिल्लीतील सातपैकी चार जागा ‘आप’ लढवत असून, तीन ठिकाणी काँग्रेस पक्ष रिंगणात उतरला आहे. निवडणूक लढवत आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या वेळी दिल्ली काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात लव्हली यांनी म्हटले की, पक्षात मी अपंग झालो असल्याचे मला वाटत आहे. दिल्ली काँग्रेस चालविण्यात मला रस उरलेला नाही. बाबरिया हेच दिल्ली काँग्रेस चालवत आहेत, अशी अनेकांची भावना झाली आहे. एवढेच नाही, तर जे लोक बाबरिया यांच्या विरोधात जातात, त्यांना पक्षातून काढून टाकण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जातो.
काँग्रेसने दिल्लीत आम आदमी पक्षाशी आघाडी केल्यामुळे संपूर्ण दिल्ली काँग्रेस या निर्णयाच्या विरोधात आहे. काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करून स्थापन झालेल्या पक्षाशी आघाडी करण्याच्या निर्णयाविरोधात संपूर्ण दिल्ली काँग्रेस पक्ष उभा होता. आज त्याच पक्षाचे अर्धे मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. त्यांच्याशी आघाडी कशासाठी? असा आमचा रास्त प्रश्न होता आणि आहे.
आमच्या मनाविरोधात जाऊन पक्षश्रेष्ठींनी ‘आप’शी आघाडी केल्यानंतर तोही निर्णय आम्ही स्वीकारला. तथापि, जागावाटपात केवळ तीन जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्यानंतर उत्तर पश्चिम आणि ईशान्य दिल्लीत दोन बाहेरच्या नेत्यांना उमेदवारी दिली गेली. हा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक होता. काँग्रेसने उदित राज यांना ईशान्य दिल्लीतून, तर जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता कन्हैयाकुमारला उत्तर पश्चिम मतदार संघातून उमेदवारी दिली आहे.
दिवंगत माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे चिरंजीव संदीप दीक्षित, राजकुमार चौहान यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांना हे निर्णय मान्य नाहीत. कन्हैयाकुमार आणि उदित राज हे दोन्ही बाहेरचे उमेदवार आहेत. वास्तविक संदीप दीक्षित हे कन्हैयाकुमार यांच्यापेक्षा जास्त प्रभावी उमेदवार ठरले असते. हळूहळू काँग्रेसमधील खदखद या निमित्ताने फसफसून बाहेर येऊ लागली आहे. ज्या पक्षाने माझ्या आईविरुद्ध शिवराळ भाषा वापरली, त्या पक्षाचा प्रचार आम्ही कोणत्या तोंडाने करावा, असा प्रश्न संदीप दीक्षित यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे, कन्हैयाकुमार यांच्या उमेदवारीविरोधात जागोजागी काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करू लागले आहेत. त्यामुळे काँग्रेस श्रेष्ठींना याची दखल घ्यावी लागेल. कदाचित, हा विरोध तीव्र झाला, तर कन्हैयाकुमार यांचा पत्ता कट होऊ शकतो.
समन्वयाचा अभाव
काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांची युती झाली असली, तरी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते परस्परांपासून अंतर राखून आहेत. दोन्ही पक्षांची आतापर्यंत एकही संयुक्त सभा झालेली नाही. याचा फायदा भाजपला मिळेल, हे तर सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. मुद्दा एवढाच की, या परिस्थितीचा फायदा करवून घेण्यात भाजपला किती यश मिळणार?