अॅस्ट्राझेनेका लसीचे साईड इफेक्ट; ब्रिटिश कंपनीची कबुली
लंडन; वृत्तसंस्था : कोरोना प्रतिबंधक अॅस्ट्राझेनेका लसीमुळे अपवादात्मक प्रकरणात थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम किंवा टीटीएस होऊ शकतो. टीटीएसनंतर रक्तात गुठळ्या तयार होऊन प्लेटलेटस्ची संख्या कमी होते. अशा स्थितीत हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोकाही असतो, अशी कबुली अॅस्ट्राझेनेका कंपनीने ब्रिटिश न्यायालयात पहिल्यांदाच दिली.
न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांतून कंपनीने संभाव्य दुष्परिणामांची बाब मान्य केली असून, याबाबतचे वृत्त टेलिग्राफ या दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. अॅस्ट्राझेनेका लसीमुळे ब्रिटनमध्ये काहींचा मृत्यू झाल्याचा तसेच काहींना गंभीर आजारांना सामोरे जावे लागल्याचा आरोप आहे. कंपनीविरुद्ध अशी 51 प्रकरणे दाखल आहेत. पीडितांनी अॅस्ट्राझेनेकाकडून सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
लस घेतल्यानंतर एप्रिल 2021 मध्ये जेमी स्कॉट नावाच्या व्यक्तीची प्रकृती बिघडली. शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याचा थेट परिणाम त्याच्या मेंदूवर झाला. याशिवाय स्कॉटच्या मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्रावही झाला. या प्रकरणात अॅस्ट्राझेनेका विरोधात तक्रार दाखल केली होती. मे 2023 मध्ये अॅस्ट्राझेनेका लसीमुळे टीटीएस आजार होऊ शकत नाही, असे उत्तर कंपनीने कोर्टात दिले होते. मात्र, यावर्षी फेब्रुवारीमध्ये हायकोर्टात सादर केलेल्या कायदेशीर कागदपत्रांमध्ये कंपनीने हा दावा मागे घेतला आणि काही प्रकरणांमध्ये त्यांच्या लसीमुळे टीटीएसची शक्यता नाकारता येत नाही, असे नमूद असलेली कागदपत्रे कोर्टात सादर केली. याउपरही टीटीएस नेमक्या कुठल्या कारणाने होतो, याची माहिती उपलब्ध नाही, असेही कागदपत्रांतून कंपनीने नमूद केले आहे.
विविध देशांतील क्लिनिकल चाचण्या आणि त्यातून उपलब्ध डेटा आमची लस सुरक्षित आहे, हेच सांगतो, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. लसीचे फायदे लसीच्या दुर्मीळ दुष्परिणामांपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहेत, असे जगभरातील नियामकांनी प्रमाणित केलेले असल्याचेही कंपनीने नमूद केले आहे.
सहा कोटी लोकांचे प्राण वाचवले
कंपनीने असाही दावा केला आहे की, पहिल्याच वर्षात जवळपास 60 लाख लोकांचे प्राण वाचवले आहेत. अॅस्ट्राझेनेका कंपनीने ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत ही लस तयार केली आहे. मेडिसिन्स हेल्थकेअर प्रॉडक्टस् रेग्युलेटरीनुसार ब्रिटनमध्ये 81 प्रकरणांत लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे लोकांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे.
163 जणांना भरपाई
ब्रिटन सरकारने फेब्रुवारीमध्ये 163 कोरोना पीडित कुटुंबीयांना नुकसानभरपाई दिली होती. साईड इफेक्ट झालेल्या या लोकांपैकी 158 जणांनी अॅस्ट्राझेनेका लस घेतली होती. याच फॉम्युलेशनची लस भारतात कोव्हिशिल्ड नावाने उत्पादित करण्यात आली, हे येथे उल्लेखनीय!
हेही वाचा :
कोलंबिया विद्यापीठातील पॅलेस्टाईन समर्थक विद्यार्थ्यांवर मोठी कारवाई
माथेफिरुच्या तलवार हल्ल्याने लंडन हादरले, अनेक जखमी
‘माझ्यासोबत राहा, मुलं जन्माला घाल’, हमासच्या दहशतवाद्याने केले प्रपोज, ती म्हणाली…