जय शिवसंग्रामचा भाजपला पाठिंबा; बावनकुळेंची नाशिक येथे घेतली भेट
नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकनेते स्व. विनायक मेटेंचे बंधू रामहरी मेटे यांनी जय शिवसंग्राम संघटनेचा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी नाशिक येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली.
जय शिवसंग्रामने जारी केलेल्या जाहीर पाठिंबा पत्रामधून भाजपा महायुतीने मराठा समाजाला टिकणारे आरक्षणासह समाजहिताचे निर्णय घेतले असा उल्लेख केला. स्व. विनायकराव मेटे यांनी अखेरपर्यंत युतीधर्म पाळत भाजपासोबत एकनिष्ठ राहिले. स्व.विनायकराव मेटे आणि मराठा भूषण अण्णासाहेब पाटील यांच्या विचाराने प्रेरित होऊन जय शिवसंग्राम संघटना कार्य पुढे चालवित आहे, असे नमूद करून बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.
भाजपा व जय शिवसंग्राम यांच्यातील समन्वयासाठी आमदार श्रीकांत भारतीय व अमित जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जय शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष सुरेशराव शेट्ये पाटील, सरचिटणीस दीपक कदम यांच्यासह जय शिवसंग्रामचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.