परभणी: पूर्णा येथे गोळीबार करुन तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न
पूर्णा, Bharat Live News Media वृत्तसेवा: एका ३२ वर्षीय युवकावर गोळीबार करून तसेच खांद्यावर धारधार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा थरारक प्रकार पूर्णा शहरातील आंबेडकर हॉल जवळ सोमवारी (दि.२९) दुपारी ४.३० च्या सुमारास घडला. या प्रकरणी संशयिताला अटक करून न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सचिन संजय मगरे (वय ३२, रा. आंबेडकर नगर, पूर्णा) यांनी पूर्णा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. गौरव उर्फ सोनू कैलास खंदारे असे संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सचिन मगरे आणि प्रविण कनकुटे हे दोघे सोमवारी दुपारी ४.३० च्या सुमारास आंबेडकर हॉल जवळ बोलत उभे होते. यावेळी संशयित आरोपी गौरव तेथे आला आणि ‘कुत्रे हो तुम्ही लय माजलात’, असे म्हणून कमरेला लावलेली काळ्या रंगाची पिस्टल काढली. आणि सचिन याच्या दिशेने गोळीबार केला, तो सचिनने चुकवला. त्यानंतर गौरवाने त्याच्या हातातील खंजिराने जीवे मारण्याच्या उद्देशाने सचिनच्या डाव्या खांद्यावर वार केला. त्यात तो जखमी झाला. या घटनेनंतर गौरव तेथून पळून गेला.
त्यानंतर सचिनने प्रविण याच्या मदतीने पूर्णा पोलिस ठाण्यात येवून तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी संशयिताला पकडून अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा शहारे करत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे आंबेडकर नगर भागात खळबळ उडाली असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा
परभणी: मोरेगाव येथे शेतीच्या वादातून सख्ख्या भावाचा निर्घृण खून
परभणी: माटेगाव नदीवरील पूल बांधकामाच्या खड्ड्यात कार कोसळली
परभणी : मानवतला ३० हजार ४६८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क; प्रशासनाकडून जय्यत तयारी