मुंबईत 27 वर्षीय तरुणीची हत्या! मृतदेह सुटकेसमध्ये आढळला; ‘लव्ह जिहाद’चा संशय
मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : मुंबईच्या मानखुर्द येथील साठेनगर परिसरात राहणाऱ्या पूनम क्षीरसागर नामक तरुणीची फसवणूक करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार लव्ह जिहादमधून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी संशयीत आरोपी निजाम खान याला अटकत करण्यात आली असून पोलिस कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, या घटनेशी संबंधित आरोपींवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी, मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे.
मिळालेली माहिती अशी की, पूनम क्षीरसागर ही तरुणी दहा दिवसांपूर्वी निजाम खान नावाच्या मुलासोबत बेपत्ता झालेली होती. पण दहा दिवसानंतर एका सुटकेसमध्ये तिचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या निर्घृण हत्येनंतर स्थानिक हिंदू समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. तसेच मुंबईतील ही तिसरी घटना आहे. त्यामुळे पोलिसांनी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असेही ते म्हणाले.
मुंबईत अनधिकृतपणे राहणाऱ्या रोहिंग्या, बांगलादेशी नागरिकांचा बंदोबस्त करायला लागेल. अन्यथा हिंदू तरुणी, महिला सुरक्षितपणे घराबाहेर पडू शकणार नाही. पूनम क्षीरसागर हिला न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्री आणि राज्य सरकारचा एक घटक म्हणून ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. २४ तासांच्या आत आरोपीवर कठोर कारवाई झाली नाही, तर उग्र आंदोलनाचा इशारा मंत्री लोढा यांनी दिला.