LokSabha Elections | इंदापूर तालुक्यात महायुतीच्या सभांचा धुमधडाका! 2 दिवसात होणार 8 सभा
इंदापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ इंदापूर तालुक्यात गुरुवार (दि. 2 मे) व शुक्रवारी (दि. 3 मे) तब्बल 8 संयुक्त सभा होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे या सभांना उपस्थित राहतील. तसेच महायुतीची सांगता सभा रविवारी (दि. 5) दुपारी 2 वाजता इंदापूर येथे होईल, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तसेच भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि. 28) दिली. इंदापूर तालुक्यात होणार्या संयुक्त सभांना उपमुख्यमंत्री अजित पवार, स्वत: हर्षवर्धन पाटील, आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व महायुतीच्या घटक पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात पुणे येथे शनिवारी अजित पवार, चंद्रकांत पाटील आदींसह बैठक झाली. त्यामध्ये प्रचार कार्याचा आढावा घेण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
ही निवडणूक गावकी -भावकीची नसून, देशाच्या भवितव्याची आहे. त्यामुळे नागरिक भावनिक होऊन मतदान करणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षांच्या काळात कोठेही जातीय वाद-दंगल झाला नाही. सर्व जाती-धर्माच्या जनतेला बरोबर घेऊन विकास करण्याचे काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. इंदापूर तालुक्याला 10 टीएमसी पाणी कमी पडत असून, त्यासाठी केंद्र सरकारकडून हजारो कोटींचा निधी आणला जाईल. तालुक्यात बेरोजगारी कमी करणे, शिक्षणासाठी नवीन दालने उघडणे, सहकारी संस्था मजबूत करणे आदी कामे केली जातील.
केंद्राचा निधी दिल्लीवरून थेट इंदापूर तालुक्यात आणण्यासाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजय ऐतिहासिक असणार आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ तालुक्यात दोन टप्पे पूर्ण झाले असून, पहिल्या टप्प्यात मी 21 ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. त्यानंतर जिल्हा परिषद मतदारसंघात 7, तसेच प्रत्येक गावात तसेच वाड्या-वस्त्यांवर आणि इंदापूर शहरात महायुतीचे प्रमुख कार्यकर्ते गावोगावी घोंगडी बैठका, कॉर्नर सभा घेत असल्याचेदेखील हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा
तालासुरांवरील पदन्यास अन् छम्छम्ची वाढतेय गोडी..!
‘कात्रज’चे सौंदर्य खुलणार ! जलचर पक्ष्यांसाठी राजीव गांधी प्राणिसंग्रहालय उभारणार नैसर्गिक अधिवास
नाशिक शहर तापले, हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद