कोल्हापूर : कासारी मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी खालावली
विशाळगड : Bharat Live News Media वृत्तसेवा तीव्र उन्हाळ्यामुळे धरणातून कासारी नदीपात्रात २५० क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे कासारी धरणाच्या पाणीसाठ्यावर विपरित परिणाम झाला असून पाणीसाठा खालावत चालला आहे. त्यामुळे मोसमी पावसाचे आगमन लांबल्यास परिस्थिती चिंताजनक होऊ शकते. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून पाण्याच्या नियोजनासाठी प्रयत्न सुरु आहेत. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत धरणातील पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कासारी मध्यम प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता २.७७ टीएमसी आहे. धरणातून वरचेवर गरजेनुसार पाणी सोडण्यात आल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा ८ टक्के अधिक आहे. आजघडीला धरणातील पाणीसाठा ४२ टक्के असला, तरी यामध्ये मृतसाठ्याचाही समावेश आहे. त्यामुळे हे सर्वच पाणी वापरता येणार नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून पाण्याचे नियोजन सुरु आहे.
गेळवडे येथील कासारी धरण शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यातील काही गावांसाठी वरदान असून, शेतीसह पिण्याचे पाणी सुद्धा याच धरणातून वापरले जाते. आजवर पाणीबाणी जाणवली नसली, तरी पावसाचे आगमन लांबल्यास परिस्थिती कठीण होऊ शकते. गेल्यावर्षी याच दिवसांमध्ये धरणात ०.९४ टीएमसी पाणीसाठा होता. यंदा तो १.१७ टीएमसी आहे. गतवर्षी पेक्षा काही अंशी पाणीसाठा जादा असला तरी पाण्याचे नियोजन हे करावेच लागणार आहे. मान्सूनचे वेळेत आगमन झाल्यास अडचण येणार नाही. महिन्याकाठी सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी १७ टक्के पाणी लागते.
महिन्याभरात खालावलेला १६ टक्के पाणीसाठा खालीलप्रमाणे
दि गतवर्षी(टीएमसी) यंदा (टीएमसी)
३० मार्च १.३० १.५८ (५८ टक्के)
१ एप्रिल १.२५ १.५६ (५७ टक्के)
३ एप्रिल १.२० १.५० (५५ टक्के)
४ एप्रिल १.१८ १.४८ (५४ टक्के)
१४ एप्रिल १.१३ १.३४ (४८ टक्के)
१५ एप्रिल १.१३ १.३३ (४८ टक्के)
१६ एप्रिल १.१३ १.३१ (४८ टक्के)
१८ एप्रिल १.१३ १.२६ (४६ टक्के)
२२ एप्रिल १.०५ १.२६ (४६ टक्के)
२४ एप्रिल १.०० १.२६ (४६ टक्के)
२८ एप्रिल ०.९४ १.१७ (४२ टक्के)
हेही वाचा :
पंतप्रधानांचे स्वागत तुतारी वाजवून करू : खा. सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
कोल्हापूर : मुख्यमंत्री शिंदे यांची प्रत्येक नेत्यासोबत वन-टू-वन चर्चा
अन्यथा राजदूतवर दूध विकतच फिरावं लागलं असतं : खा. संजय राऊतांच विधान चर्चेत