सवयींचे ‘मालक’

सुजाता पेंडसे
‘प्रत्येक माणूस हा सवयींचा गुलाम असतो.’ हे वाक्य आपण हजारदा ऐकलेले आहे किंवा आपल्यातल्या प्रत्येकाला त्याचा अनुभवही असतोच. तुम्ही दिवसभरात काय काय करता, त्यावर एक द़ृष्टिक्षेप टाका; मग तुमच्या लक्षात येईल की, तुम्ही किती तरी बर्या-वाईट सवयींच्या अधीन झालेले आहात. अगदी सकाळी उठल्यापासूनच्या दिनचर्येचा विचार केला तर लक्षात येईल की, प्रत्येक गोष्ट ही सवयीमुळेच होत असते. कुणाला तरी पहाटे उठायची सवय असते. कुणाला उशिरापर्यंत झोपायची सवय असते. कुणाला सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो. कुणी कॉफी घेतो, कुणी तिखटच जेवतो, कुणाला जेवल्यावर चहा लागतो. कुणी तरी हेल्थ कॉन्शस असतो, तर कुणी आजारी पडल्याशिवाय डॉक्टरांकडे जातच नाही. एखाद्याला सतत निंदा करायची असते, तर कुणी तरी व्यसनाधीन असतो, कुणी जुगार खेळत असतो. अशा असंख्य प्रकारच्या सवयींनी माणसाचा ताबा घेतलेला असतो.
कोणतीही सवय लावायला… मोडायला किमान एकवीस दिवस सातत्याने प्रयत्न करावे लागतात. या सवयींच्या मागेही माणसाचे मनोव्यापार महत्त्वाची भूमिका बजावत असतात. ती व्यक्ती काय विचार करते, किती उत्कटतेने विचार करते आणि कृती किंवा वर्तन कसे करते, यावर सवयींचे लागणे-सुटणे अवलंबून असते.
बरेचदा आपल्याला एक सवय आहे, ती वाईट आहे हे समजते; पण ती सोडणं जमत नाही. वारंवार प्रयत्न केले, तरी ती सुटत नाही; मग माणूस निराश… हताश होऊन पुन्हा त्या वाईट सवयींच्या गुलामीत राहू लागतो. एखादी सवय लावणे हे खरं तर तुमच्या सुप्त मनातून घडवून आणले जात असते. पोहणे, सायकल चालवणे, नृत्य करणे, गाडी चालवणे किंवा अशा अनेक गोष्टी तुम्ही जागरूकपणे सुरू करता. मन लावून त्या शिकता. त्या सवयीचा सुप्त आराखडा हळूहळू तुमच्या मनावर कोरला जातो. हा ठसा अंतर्मनापर्यंत पोहोचेपर्यंत तुम्ही करत राहिलात, तर त्याचा एक पॅटर्न बनतो आणि तुम्हाला ती सवय लागते; मग ती विसरणं सहज शक्य नसतं, तो जवळजवळ ‘मूळ स्वभाव’ होईपर्यंत तुमच्यात रुजून जातो.
चांगली सवय निवडायची की वाईट, याचे स्वातंत्र्य तुम्हाला असते; पण तोपर्यंतच जोवर ती तुमच्या अंगात भिनत नाही. म्हणजेच मानसिकद़ृष्ट्या तुम्ही त्याच्याशी एकरूप होत नाही. बराच काळ नकारात्मक विचार करत राहिलात, तर तीही एक सवय बनते, जणू मूळ स्वभाव बनतो. अशा सवयी सोडवणे अत्यंत कठीण जाते. महत्प्रयासाने वाईट सवय बदलावी लागते. एक उदाहरण घेऊया. एक व्यक्ती त्याच्या आयुष्यात असलेले ताणतणाव विसरून जाण्यासाठी दारू पिऊ लागली. त्या नशेत राहिलं, तर तेवढा काळ दु:खाचा विसर पडतो, असं वाटून तो पीत राहिला आणि मग दारू पिण्याच्या सवयीच्या इतका आहारी गेला की, त्याचा स्वत:वर कंट्रोल राहिना.
जेव्हा मन ताळ्यावर असे, तेव्हा तो ठरवायचा, काही झालं तरी दारू सोडायची; पण पुन्हा तो पिऊ लागायचा. अशा सवयींमुळे त्याचं घरचं वातावरण पूर्णत: बिघडलं. पत्नी मुलीला घेऊन माहेरी गेली आणि त्याची अक्षरश: परवड सुरू झाली. एकदा त्याला सुप्त मनाद्वारे व्यसनमुक्ती करता येते किंवा दोन्ही मनांमधल्या सुसंवादाने चांगली सवय लावता येते, हे समजले. आपल्या आयुष्यातले अपयश हे आपल्याच विचारांचे फळ आहे, हे नीट समजून घेतल्यानंतर त्याने प्रयत्न सुरू केले. मनाच्या शांत, शिथिल अवस्थेत दिलेल्या स्वयंसूचना ही पहिली पायरी त्याने पार पाडली. परंतु, मध्येच त्याला दारू पिण्याची अनिवार इच्छा व्हायची.
शरीरात सूक्ष्म थरथर सुरू व्हायची. आताच्या आता जाऊन आपली इच्छा पूर्ण करावी, असे वाटायचे. अशावेळी तो त्याच्या मुलीचा चेहरा आठवे. ती एकदा त्याला घट्ट मिठी मारून म्हणाली होती, ‘बाबा, तुम्ही आम्हाला घरी न्या. आपण तिघे मिळून आनंदाने राहू!’ या वाक्याची आठवण तो स्वत:ला वारंवार देत राही आणि मग त्याने एक कल्पनाचित्र मनाशी रंगवले की, तो आणि त्याची मुलगी त्यांच्या घराच्या हॉलमध्ये बसले आहेत. शेजारी बायको आहे आणि मुलगी म्हणतेय, ‘बाबा, आपण तिघेही एकत्र आहोत. मला खूप म्हणजे खूप आनंद झालाय!’ तिचा तो आनंदाने खुललेला चेहरा हे त्याला व्यसन सोडवण्याला कारण ठरले. आपल्या मुलीवर त्याचे खूप प्रेम होते. ती आनंदी असावी, ही त्याची तीव्र आंतरिक इच्छा होती. त्यामुळे व्यसनाला स्वत:पासून दूर करण्यात तो अखेर यशस्वी झाला. पुढे त्याचे आयुष्य सुखाचे झाले.
हे झाले व्यसनाच्या बाबतीत. याशिवाय अनेक छोट्या-मोठ्या वाईट सवयी प्रत्येकाला असतात. जसे की, अतिविचार किंवा कोणतीही गोष्ट मनाला लावून घेणे, अनारोग्य बहाल करणार्या सवयी आदी.
कोणत्याही सवयीपासून सुटका करून घ्यायची आहे, ही तीव्र इच्छा तुमच्या मनात निर्माण झाली, तर पन्नास टक्के काम तिथेच झालेले असते. विचार + भावना + कृती अशा तिन्ही पायर्या पार पाडल्या की, परिणाम दिसतात. विचारांना इंधन समजूया, तर भावना आगपेटीची पेटती काडी समजूया. विचारांच्या इंधनाला तीव्र उत्कट इच्छेची काडी लावली की आग पेटतेच, म्हणजे कृती होतेच, त्यानंतर हवे ते परिणाम दिसून येतात.
मुळात आपली सवय वाईट आहे, हेच कित्येकांना पटत नसते; तर काहीजण ‘कळतंय हो पण वळत नाही!’ इथपर्यंत पोहोचलेले असतात. तर, काहीजण ‘खूप म्हणजे खूप प्रयत्न करतोय; पण जमतच नाही!’ असे म्हणत आहे त्याच चक्रात गुरफटतात.
कोणतीही सवय ही चांगली आहे की वाईट आहे, हे आधी स्वत:पासून क्षणभर बाजूला राहून, म्हणजे अलिप्त राहून, खोलवर विचार करून जाणून घेतली पाहिजे. चांगल्या सवयीसुद्धा लावाव्याच लागतात, त्यालाही सरावाची गरज असते. मनात आतपर्यंत पटल्याशिवाय, तसंच त्या विचारावर श्रद्धा, विश्वास ठेवल्याशिवाय हेवे ते साध्य करता येणार नाही. म्हणजे ‘भर गर्दीत गाडी चालवता आली पाहिजे!’ ही इच्छा असेल, तर ‘गर्दी भरपूर आहे; दुसरं कुणी तरी माझ्या गाडीवर आदळलं तर? मी कुठेतरी पडलो तर?’ असे शंभर नकारात्मक विचार मनात आणत राहिलात तर गाडी चालवणं कधीच जमणार नाही.
उलट स्वत: गाडी चालवल्यानंतर सोपी होणारी कामे, मिळणारा आनंद, वाढलेला आत्मविश्वास याचा विचार करून गाडी चालवायला लागा. प्रत्येक नवी सवय लावताना प्रयत्नांचा सराव करावाच लागतो. तोही जोवर तुम्ही त्यावर कमांड मिळवत नाही, तोवर ते करणे भागच आहे.
वाईट सवयी म्हणजे एकप्रकारचे मोहजाल असते, त्या क्षणभर मनाला आनंद देतात; मग पुन्हा मन निराश होते आणि ‘पुन:श्च हरिओम’ म्हणत माणूस सवयीचे अक्षरश: गुलामित्व पत्करतो. तेव्हाच… त्या क्षणी ठरवा की, तुम्ही कुणाचेही गुलाम होण्यासाठी जगत नाही; तर कोणत्याही सवयींचे मालक बनण्याचा प्रयत्न करा. अर्थातच, हे सोपे नाही; पण स्वत:च्या आयुष्याची नाव भरकटू द्यायची नसेल, तर वल्ही हातात घेऊन, नाव योग्य दिशेला नेणारा नावाडी व्हावंच लागेल ना! मग त्यासाठी काय काय करायचं. सोडायचं, ते मनाशी पक्कं ठरवा. तो सुप्त मनाचा पॅटर्न बनेपर्यंत सराव करा; मगच परिणाम दिसतील.
