ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटोच्या दफनभूमीचा सापडला ठावठिकाणा

रोम : प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञांमधील सॉक्रेटिस, प्लेटो आणि अ‍ॅरिस्टॉटल या गुरू-शिष्य परंपरेचा आजही गौरवाने उल्लेख होत असतो. प्लेटोने आपला गुरू सॉक्रेटिसचे तसेच स्वतःचेही तत्त्वज्ञान लिहून ठेवले. त्याने ‘अ‍ॅकॅडमी’ नावाची शिक्षण संस्थाही सुरू केली होती. 2300 वर्षांपूर्वी प्लेटोचा मृत्यू झाल्यानंतर याच अ‍ॅकॅडमीच्या आवारात त्याचा देह दफन करण्यात आला. हे ठिकाण इसवी सनपूर्व 86 मध्ये एका रोमन …

ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटोच्या दफनभूमीचा सापडला ठावठिकाणा

रोम : प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञांमधील सॉक्रेटिस, प्लेटो आणि अ‍ॅरिस्टॉटल या गुरू-शिष्य परंपरेचा आजही गौरवाने उल्लेख होत असतो. प्लेटोने आपला गुरू सॉक्रेटिसचे तसेच स्वतःचेही तत्त्वज्ञान लिहून ठेवले. त्याने ‘अ‍ॅकॅडमी’ नावाची शिक्षण संस्थाही सुरू केली होती. 2300 वर्षांपूर्वी प्लेटोचा मृत्यू झाल्यानंतर याच अ‍ॅकॅडमीच्या आवारात त्याचा देह दफन करण्यात आला. हे ठिकाण इसवी सनपूर्व 86 मध्ये एका रोमन सरदाराने उद्ध्वस्त केले होते. कालौघात ते नेमके कुठे आहे हे एक गूढच राहिले होते. आता अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संशोधकांनी प्राचीन लेख वाचण्यात यश मिळवून ही दफनभूमी नेमकी कुठे आहे, हे शोधल्याचा दावा केला आहे.
काही प्राचीन कागदपत्रांच्या सहाय्याने याबाबतचा शोध घेण्यात आला आहे. पिसा युनिव्हर्सिटीतील ग्रॅझियानो रॅनोशिया या तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकाने आपल्या सहकार्‍यांच्या सहाय्याने ‘एआय’चा वापर करून हे संशोधन केले. पॉम्पेईजवळील हर्क्युलॅनियम नावाच्या प्राचीन रोमन शहरात एका कागदाची गुंडाळी सापडली होती. या कागदांच्या सहाय्याने हे संशोधन करण्यात आले. पॉम्पेईप्रमाणेच हर्क्युलॅनियमही इसवी सन 79 मध्ये माऊंट वेसुवियसच्या उद्रेकानंतर उद्ध्वस्त झाले होते.
या ज्वालामुखीच्या उद्रेकाने संपूर्ण परिसर राखेने भरला होता. काही प्राचीन गुंडाळ्या या उद्रेकाने कार्बनाईज्ड झाल्या. त्यामध्येच ‘फिलोडेमस ऑफ गॅडरा’च्या लिखाणाचाही समावेश आहे. हा अथेन्समध्ये शिकलेला एक तत्त्वज्ञ होता तो नंतर इटलीमध्ये राहू लागला. त्याच्या लिखाणाला ‘अ‍ॅकॅडमीचा इतिहास’ असेही म्हटले जाते. त्यामध्ये प्लेटोने इसवी सनापूर्वी चौथ्या शतकात स्थापन केलेल्या अ‍ॅकॅडमीची तपशीलवार माहिती आहे. यामध्ये प्लेटोचे जीवनचरित्र आणि त्याच्या दफनभूमीचीही माहिती आहे. अ‍ॅकॅडमीमध्येच प्लेटोला दफन करण्यात आले होते, याची माहिती संशोधकांना पूर्वीपासूनच होती. त्याचे हे दफनस्थळ इसवी सनपूर्व 86 मध्ये रोमन जनरल सुल्ला याने उद्ध्वस्त केले होते. प्लेटोचा अथेन्समध्ये इसवीसनपूर्व 348 किंवा 347 मध्ये मृत्यू झाला होता.
अ‍ॅकॅडमीमध्ये त्याला नेमके कुठे पुरण्यात आले होते हे समजलेले नव्हते. आता संशोधकांनी विविध कटिंग-एज टेक्निक्सचा, ज्यामध्ये इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट ऑप्टिकल इमेजिंग, थर्मल इमेजिंग आणि टोमोग्राफीचा समावेश होतो, त्यांचा वापर करून हे प्राचीन दस्तावेज वाचण्यात यश मिळवले. हे दस्तावेज सध्या नॅशनल लायब्ररी ऑफ नेपल्समध्ये ठेवलेले आहेत. संशोधकांनी एक हजार शब्दांची संगती व अर्थ लावण्यात यश मिळवले. याचा अर्थ फिलोडेमसने लिहिलेल्या मजकुरापैकी तीस टक्के मजकूर वाचण्यात त्यांना यश आले. या मजकुरात असे दिसून आले की प्लेटोला त्याच्यासाठी राखून ठेवलेल्या बागेत म्हणजेच त्याच्या अथेन्समधील शाळेतील खासगी ठिकाणी असलेल्या बागेत दफन करण्यात आले होते. हे ठिकाण म्युझियनच्या जवळ आहे.