वर्षातून दोनवेळा होणार CBSE बोर्ड परीक्षा, काय आहे नवीन योजना?
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : शिक्षण मंत्रालयाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला (CBSE) शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून वर्षातून दोनवेळा बोर्ड परीक्षा घेण्याबाबत विचार करण्याचे संकेत दिले आहेत. विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी करणे आणि त्यांना अधिक संधी उपलब्ध करून देणे हा यामागील उद्देश आहे. याबाबतचे वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. दरम्यान, सेमिस्टर प्रणालीसाठी तत्त्काळ कोणताही योजना नसल्याचे सांगण्यात आले आहे.
वर्षातून दोनवेळा बोर्ड परीक्षा घेणे शक्य आहे का? यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. कारण शिक्षण मंत्रालयाने सीबीएसईला वर्षातून दोनवेळा बोर्ड परीक्षा आयोजित करण्यासाठी तयार करण्यास सांगितले आहे, असेही सुत्रांनी म्हटले आहे.
सूत्रांनी असेही नमूद केले आहे की शिक्षण मंत्रालयाने CBSE बोर्डाला पुढील महिन्यात शाळेच्या मुख्याध्यापकांशी सल्लामसलत करण्यास सांगितले आहे. त्यांच्याकडून वर्षातून दोनवेळा सीबीएसई बोर्ड परीक्षा घेण्याबाबत सूचना मागवल्या आहेत.
२३ ऑगस्ट २०२३ रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जाहीर केले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार नवीन अभ्यासक्रम रुपरेषा (NCF) तयार आहे. सीबीएसई अभ्यासक्रमात वर्षभरात दोन बोर्ड परीक्षांच्या शिफारशीसह विविध बदल सुचवले असल्याचे पीटीआयने त्यांना मिळालेल्या काही दस्तऐवजांच्या आधारे म्हटले आहे.
“विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ आणि संधी मिळावी यासाठी वर्षातून किमान दोनदा बोर्ड परीक्षा घेतल्या जातील. यामुळे विद्यार्थी नंतर त्यांनी पूर्ण केलेल्या विषयांमध्ये बोर्डाच्या परीक्षेला बसू शकतील आणि त्यासाठी त्यांची तयारीही होईल. तसेच त्यांचे सर्वोत्कृष्ट गुण मिळवण्याच्या कामगिरीत सातत्य राहील,” असेही म्हटले आहे.
याव्यतिरिक्त २४ फेब्रुवारी २०२४ रोजी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले होते की शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा बोर्डाच्या परीक्षेला बसण्याची संधी मिळेल.
प्रधान यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पीटीआयशी बोलताना म्हटले होते की, विद्यार्थ्यांना वर्षातून दोनवेळा बोर्ड परीक्षा देणे अनिवार्य नसेल. विद्यार्थ्यांना इंजिनियरिंग प्रवेश परीक्षा जेईई प्रमाणेच १० वी आणि १२ वी साठी दोनवेळा परीक्षा देण्याचा पर्याय असेल. यामुळे त्यांना सर्वोत्कृष्ट गुण मिळवण्याची संधी असेल. पण हे पूर्णतः ऐच्छिक असेल.
हे ही वाचा :
साहसी क्षेत्रात करिअर करायचंय?
रिलेशनशिप मॅनेजर करिअरचा उत्तम मार्ग
Competitive Examination : ‘करंट अफेअर्स’ची तयारी करताय?
पवनऊर्जेतील करिअर संधी