सोलापूर : आबा कांबळे खून खटला; सातजणांना जन्मठेप
सोलापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : पत्रा तालीम येथील कार्यकर्ते आबा कांबळे याचा कोयत्याने वार करून खून केल्याच्या गाजलेल्या खटल्यात न्यायालयाने गामा पैलवानसह सात आरोपींना जन्मठेपेशी शिक्षा सुनावली. निकाल ऐकण्यासाठी न्यायालय परिसरात दोन्हीकडील नातेवाईक, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.
सुरेश ऊर्फ गामा अभिमन्यू शिंदे (वय 74, रा. दक्षिण कसबा, पाणी वेस, सोलापूर), रविराज दत्तात्रय शिंदे (वय 32, रा. शाहीर वस्ती, सोलापूर), अभिजित ऊर्फ गणेश चंद्रशेखर शिंदे (वय 32, रा. निराळे वस्ती, सोलापूर), प्रशांत ऊर्फ आप्पा पांडुरंग शिंदे (वय 36, दक्षिण कसबा, पाणी वेस, सोलापूर), नीलेश प्रकाश महामुनी (वय 41, रा. शेळगी, सोलापूर), तौसिफ गुरुलाल विजापुरे (वय 33, रा. दक्षिण कसबा, पाणी वेस, सोलापूर) आणि विनित ऊर्फ ईश्वर भालचंद्र खाणुरे (वय 31, रा. दक्षिण कसबा, पाणी वेस, सोलापूर) अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
विशेष न्यायाधीश संगीता शिंदे यांनी आरोपींनी शिक्षा सुनावली. गामा पैलवानचा मुलगा ॠतुराज शिंदे याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सर्व आरोपींनी कट रचून सत्यवान ऊर्फ आबा विष्णू कांबळे यांचा खून केल्याचा गुन्हा फौजदार चावडी पोलिसात दाखल झाला होता. ही घटना सात जुलै 2018 रोजी नवी पेठेतील मोबाइल गल्लीत घडली होती. आबा कांबळे याचा धारदार शस्त्रांनी हल्ला करून खून करण्यात आला होता.
न्यायालयाने सर्व आरोपींना जन्मठेप, दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तीन महिन्याची शिक्षा, भारतीय शस्त्र अधिनियम कायद्यानुसार एक वर्षे कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा सुनावली. हा खटला दुर्मिळ स्वरुपाचा असल्याने आरोपींना फाशी न देता जन्मठेपेच्या शिक्षेची मागणी जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपुत यांनी केली.
आबा कांबळे खून खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत, आरोपींतर्फे अॅड. श्रीकांत जाधव, अॅड. शशी कुलकर्णी, अॅड. शिव झुरळे, अॅड. प्रशांत नवगिरे, अॅड. आकाश देठे यांनी काम पाहिले.