ऑस्ट्रेलियाच्या किनार्यावर 29 व्हेल्सचा मृत्यू
कॅनबेरा, वृत्तसंस्था : डॉल्फिन माशाची प्रजाती असलेल्या 29 पायलट व्हेल्सचा ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनार्यावर मृत्यू झाला आहे. सुमारे 160 व्हेल पिया कोर्टिस किनार्यावर पोहोचले होते. यातील 130 व्हेल माशांना वाचवण्यात यश मिळाले आहे. व्हेल पुन्हा किनार्यावर येऊ नयेत या भीतीने विमाने आणि नौकांच्या मदतीने त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे. बीचवर आल्यानंतर पायलट व्हेल सहा तासच जिवंत राहू शकतात, असे समुद्री तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आता पायलट व्हेल माशाचे सँपल घेऊन तपासणी केली जाणार आहे. ज्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर हे मासे समुद्रकिनार्यावर कसे आले, या पायलट व्हेल माशांमध्ये मादा व्हेल माशांचा समावेश आहे काय हे समजेल. पायलट व्हेल हा खूपच सामाजिक असतो. हे एकमेकांची खूपच काळजी घेतात. विशेषतः एखादा व्हेल मासा आजारी पडतो अथवा किनार्यावर अडकतो, त्यावेळी दुसरे व्हेल मासे त्यांना मदत करण्यासाठी पोहोचतात. गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या समुद्रकिनार्यावर पायलट व्हेल माशांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये सुमारे 100 पायलट व्हेल मासे समुद्रकिनार्यावर पोहोचले होते आणि यातील 51 माशांचा मृत्यू झाला होता.
दुसरीकडे गेल्यावर्षी स्कॉटलँडमध्ये 55 पायलट व्हेल मासे मारले गेले होते. 2022 मध्ये न्यूझीलंडमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे 500 पायलट व्हेल मासांचा मृत्यू झाला होता.