रायबरेलीत गांधी विरुद्ध गांधी लढतीची शक्यता

गांधी घराण्याला विजयाची हमखास हमी देणार्‍या उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदार संघात यंदा सख्ख्या चुलत बहीण-भावांमध्ये चुरशीची लढत रंगण्याची शक्यता आहे. तेथून काँग्रेसच्या नेत्या खासदार प्रियांका गांधी-वधेरा यांच्याविरोधात भाजपने त्यांचे चुलत बंधू वरुण गांधी यांना मैदानात उतरवण्याची पूर्ण तयारी केली आहे. रायबरेली मतदार संघात 2019 च्या निवडणुकीत प्रियांका गांधी यांनी विजय मिळविला होता. उत्तर प्रदेशात …

रायबरेलीत गांधी विरुद्ध गांधी लढतीची शक्यता

ताजेश काळे

गांधी घराण्याला विजयाची हमखास हमी देणार्‍या उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदार संघात यंदा सख्ख्या चुलत बहीण-भावांमध्ये चुरशीची लढत रंगण्याची शक्यता आहे. तेथून काँग्रेसच्या नेत्या खासदार प्रियांका गांधी-वधेरा यांच्याविरोधात भाजपने त्यांचे चुलत बंधू वरुण गांधी यांना मैदानात उतरवण्याची पूर्ण तयारी केली आहे.
रायबरेली मतदार संघात 2019 च्या निवडणुकीत प्रियांका गांधी यांनी विजय मिळविला होता. उत्तर प्रदेशात तेव्हा काँग्रेसला मिळालेली ही एकमेव जागा. अमेठीमध्ये राहुल गांधी यांचा पराभव भाजपच्या स्मृती इराणी यांच्याकडून झाला होता. त्यामुळे यावेळी काँग्रेसविरुद्ध रायबरेलीची जागा जिंकण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रायबरेलीत गांधी विरुद्ध गांधी अशी लढत साकारण्याची तयारी सुरू आहे.
रायबरेलीत पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 26 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे रायबरेलीतून प्रियांका गांधी- वधेरा यांची इंडिया आघाडीकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांच्याविरोधात वरुण गांधी यांना मैदानात उतरविण्याचा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे. प्रियांका यांना वरुण हे चांगली टक्कर देऊन विजयी होऊ शकतात, असा अहवाल भाजपने केलेल्या एका गोपनीय सर्वेक्षणातून पुढे आला आहे. त्यानुसार वरुण यांना रायबरेलीतून लढण्यासाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, वरुण यांनी त्यासाठी अजून होकार कळविलेला नाही.
भाजपने पिलीभीतमधून वरुण यांना तिकीट नाकारले होते. तेथून त्यांनी 2009 आणि 2019 मध्ये विजय मिळविला होता. वरुण यांच्या मातोश्री व माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना भाजपने सुलतानपूर मतदार संघातून उमेदवारी दिली आहे.
वरुण यांना रायबरेलीतून लढवायची तयारी सुरू असल्यानेच त्यांना पिलीभीतमधून उमेदवारी नाकारण्यात आल्याचे बोलले जाते. प्रियांका यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास वरुण यांनी होकार दिल्यास रायबरेलीत हायप्रोफाईल लढत रंगण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी ही संभाव्य लढत अत्यंत प्रतिष्ठेची ठरणार आहे. प्रियांका यांच्या विरोधात भाजपकडून वरुण यांना उमेदवारी दिली जाते की अन्य कोणाला, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.