नागपूर : पश्चिम विदर्भातही कमी मत टक्का, कुणाला धक्का ?
राजेंद्र उट्टलवार
नागपूर : राज्यात दुसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या एकंदर 8 जागांपैकी विदर्भातील पाच मतदारसंघात आज (दि. २६) मतदान झाले. पूर्व विदर्भाप्रमाणेच पश्चिम विदर्भातही मतटक्का सरासरी 58 ते 60 टक्क्यांच्या खाली असल्याने नेमका धक्का सत्तापक्षाला की विरोधकांना याविषयी प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. कडक उन्हासोबतच बदलते वातावरण, अवकाळी पावसाचे सावट या मतदानावर असल्याने मतांचा टक्का वाढणार की पहिल्या टप्प्याप्रमाणेच कमी होणार असा अंदाज व्यक्त होत होता. Lok Sabha Election 2024
राज्यातील हिंगोली, परभणी, नांदेड यासोबतच पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ- वाशिम आणि पूर्व विदर्भातील वर्धा अशा पाच लोकसभा मतदारसंघात आज लोकसभा निवडणुकीसाठी काही ठिकाणी आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारीचा अपवाद वगळता शांततेत मतदान झाले. बुधवारी सायंकाळी निवडणूक प्रचार तोफा शांत झाल्या. यापूर्वी पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला पूर्व विदर्भात कडक उन्हाचा तडाखा, मतदारांची अनास्था यातून नागपूर, रामटेकसह पाच लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी मतदान पाहायला मिळाले. Lok Sabha Election 2024
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडल्यानंतर होणाऱ्या या निवडणुकीत मराठवाड्यात भाजपला फायदा होतो की, काँग्रेस नव्या चेहऱ्यासह आपली पतप्रतिष्ठा कायम ठेवते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. हिंगोली, यवतमाळला उमेदवार बदलल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अमरावतीत खासदार नवनीत राणा यावेळी भाजपच्या उमेदवार म्हणून नशीब आजमावत आहे. काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे, प्रहारचे दिनेश बुब आणि आनंदराज आंबेडकर असा चौरंगी सामना असून वर्धेत भाजप खासदार रामदास तडस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अमर काळे आणि यवतमाळमध्ये शिवसेना, महायुतीच्या राजश्री पाटील विरुद्ध मविआचे संजय देशमुख अशी थेट सामना होत आहे.
तर दुसरीकडे बुलढाणा मतदारसंघात विद्यमान शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे नरेंद्र खेडेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मगर असा तर अकोला मतदारसंघात विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे (भाजप) विरोधात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील अशी तिहेरी लढत होत आहे.
सायंकाळी शेवटच्या तासात काही मतदारसंघात काही केंद्रावरील मतदारांच्या रांगा लक्षात घेता मतदानाची अंतिम आकडेवारी येण्यास काहीसा उशीर लागणार असल्याने आज दुसऱ्या टप्प्यात मोदींच्या नेतृत्वाखालील स्थिर सरकारला की परिवर्तनाला जनतेने कौल दिला. हे येत्या 4 जून रोजीच स्पष्ट होणार आहे.
राज्यात आजचे मतदान 5 वाजेपर्यंत
वर्धा – 56.60 टक्के
अकोला – 52.49
अमरावती – 54.50
बुलढाणा – 52.24
हिंगोली – 52.03
नांदेड – 52.47
परभणी – 53.79
यवतमाळ-वाशिम – 54.04
मतदान सरासरी – 53.51टक्के
हेही वाचा
नागपूर: खरीप हंगामात वाढणार कापूस, सोयाबीन, धान पीक
नागपूर : दुसऱ्या टप्प्यात सुरू झाला मतसंग्राम, काय म्हणतात उमेदवार ?
नागपूर: लग्नाला जाताना भीषण अपघात, दाम्पत्याचा मृत्यू, ६ जण जखमी