अमरावती लोकसभेसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत 43.76 टक्के मतदान
अमरावती, Bharat Live News Media वृत्तसेवा : Lok Sabha Election 2024 : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकी अंतर्गत अमरावती लोकसभेत आज 26 एप्रिल रोजी शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत 43.76 टक्के मतदान झाले आहे. सकाळी सात वाजता पासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. अमरावती लोकसभेत सहा विधानसभांचा समावेश आहे. अचलपूर मध्ये सर्वाधिक 49.70 टक्के तर अमरावती विधानसभेत 43.29 टक्के मतदान झाले आहे.
बडनेरा विधानसभेत 41.52 टक्के तर दर्यापूर विधानसभेत 42.00 टक्के, मेळघाट विधानसभेत 46.75 टक्के आणि तिवसा विधानसभेत 39.96 टक्के मतदान दुपारी एक वाजता पर्यंत झाले आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी सरासरी 17.73 टक्के तर दुपारी एक वाजता पर्यंत सरासरी जिल्ह्यात 31.40% मतदान झाले होते. सायंकाळी सहा वाजता पर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे.
अमरावती मतदारसंघात एकूण 18 लाख 36 हजार 78 मतदार आहेत. 1 हजार 983 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडते आहे. अमरावती लोकसभेच्या रिंगणात एकूण 37 उमेदवार आहेत. त्यामध्ये भाजपकडून नवनीत राणा, काँग्रेसकडून बळवंत वानखडे तर प्रहार कडून दिनेश बुब आणि रिपब्लिकन व वंचित कडून आनंदराज आंबेडकर या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. प्रमुख उमेदवारांसह प्रशासन देखील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत आहे.