मेळघाटातील 6 गावांचा मतदानावर बहिष्कार! मूलभूत सोयी सुविधा नसल्याने ग्रामस्थ आक्रमक
अमरावती, Bharat Live News Media वृत्तसेवा : एकीकडे संपूर्ण देशभर 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मात्र, आदिवासी बहुल भाग असलेल्या मेळघाटातील सहा गावांनी मूलभूत सोयी सुविधा नसल्याने अमरावती लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकला आहे. शुक्रवारी (दि. 26) सकाळपासून या गावातील नागरिक मतदान केंद्रावर पोहोचलेच नाही. त्यामुळे मतदान केंद्र ओस पडली होती. अतिदुर्गम आदिवासी बहुल भाग असलेल्या धारणी तालुक्यातील रंगुबेली, धोकळा, कुंड, खामदा-किन्हीखेडा आणि खोपमार या सहा गावांचा त्यामध्ये समावेश आहे.
शुक्रवारी सकाळपासून संपूर्ण जिल्ह्यात लोकसभेसाठी मतदान होत असताना मेळघाटमधील सहा गावातील ग्रामस्थांनी मतदान करण्यास नकार दिला आहे. या गावांमध्ये रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आदी मूलभूत सोयी सुविधा नाहीत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे तक्रारी करूनही कुठलीच दखल घेतली जात नाही. त्यामुळे चारही गावातील ग्रामस्थांनी, आम्ही अमरावती लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नाही, अशी भूमिका घेत निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास आगामी निवडणुकीवर देखील नागरिकांनी बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान प्रशासनाच्या वतीने गावातील ग्रामस्थांना मतदान करण्यासाठी समजाविण्यात आले. मात्र, ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. विशेष म्हणजे यावेळेस मेळघाट हा अतिदुर्गम भाग असल्याने सर्वाधिक 354 मतदान केंद्र येथे प्रशासनाच्या वतीने निश्चित करण्यात आले आहे. दोन दिवस आधीच प्रशासनाने येथे मतदानासाठी तयारी पूर्ण केली होती. मात्र त्यानंतरही मेळघाटातील या चार गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला. उर्वरित मेळघाटातील गावांमध्ये मतदान सुरू आहे.