पूर्णा तालुक्यात १४९०२१ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

पूर्णा तालुक्यात १४९०२१ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

पूर्णा : Bharat Live News Media वृत्तसेवा: परभणी लोकसभा निवडणूक २०२४ करीता तारीख २६ एप्रिल २०२४ रोजी तालुक्यातील ग्रामीण व पूर्णा शहरीसह एकूण १४९ मतदान केंद्रावर १४९०२१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात ग्रामीण ११७ तर शहरी ३२ मतदान केंद्र असून ग्रामीण पुरुष ६१२२३, महिला ५५५१५ आणि शहरी पुरुष १६१०३, महिला १६१८० अशी एकूण १४९०२१ मतदाराची संख्या आहे.
मतदानासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड विधानसभा सहा निवडणूक निर्णय अधिकारी जिवराज डापकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व निवडणूक प्रशिक्षण प्रक्रिया पार पाडण्यात आली. तारीख २५ एप्रिल रोजी गंगाखेड येथील श्रिसंत जनाबाई महाविद्यालय निवडणूक प्रशिक्षण केंद्र येथून असंख्य प्रशिक्षीत झोनल व इतर आवश्यक मतदान केंद्र अधिकारी कर्मचारी बसद्वारे ईव्हीएम मतदान यंत्रासह नियुक्ती केलेल्या मतदान केंद्रांवर मुक्कामी रवाना झालेत.
निवडणुकीच्या दिवशी आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांचे गस्ती पथके नियुक्ती करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, सर्व अटी-शर्तींच्या अधिन राहून संबंधित निवडणूक अधिकारी कर्मचारी व इतर आवश्यक यंत्रेणेसह सज्ज झाले आहेत.
दरम्यान, निवडणूक पूर्व व‌ मतदानाच्या दिवशी कुठेही कोणत्याही मतदान केंद्रांवर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा, चुडावा, ताडकळस येथील पोलीस अधिकारी हे तगडा बंदोबस्त ठेवणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस, शिपाई, होमगार्ड तैनात असणार आहेत. त्याचबरोबर पूर्णा व पालम तालुक्यात संवेदनशील असलेल्या ८ मतदान केंद्रावर महाराष्ट्र पोलिस, होमगार्ड यासह केंद्रीय राखीव पोलीस दल, केरला बटालियन पोलीस दल सरंक्षणार्थ हजर असतील, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांनी दिली.