महायुतीचे इच्छुक गॅसवर, जागा वाटप लांबले
मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्याचा प्रचार थंडावला तरी महायुतीत पाच जागांचा निर्णय होऊ शकलेला नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार आधीच जाहीर झाल्याने ते मतदारसंघ पिंजून काढत असताना उमेदवारी मिळणार का नाही याचा निर्णय होत नसल्याने महायुतीचे इच्छुक उमेदवार आता गॅसवर आहेत. शिल्लक राहिलेल्या मतदारसंघात पाचव्या टप्प्यात निवडणूक होणार त्यासाठी 3 मे हा उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे आता उमेदवारी जाहीर झाली तरी या उमेदवारांना प्रचारासाठी फक्त पंधरा दिवसांचा कालावधी मिळणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्याचे मतदान 26 एप्रिलला होत आहे. या निवडणुकीसाठी बुधवारी 24 तारखेला प्रचार थंडावला. मात्र राज्यातील निवडणूक संपायला आता जेमतेम तीन आठवड्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. असे असताना महायुतीचे अखेरच्या टप्प्यात निवडणूक होणार्या सहा जागांवरील उमेदवार जाहीर होणे बाकी आहे. त्यापैकी चार ते पाच जागांवर महायुतीतील घटक पक्षांनी दावे प्रतिदावे केल्याने जागा वाटप लांबले आहे.
ठाणे, पालघर, नाशिक, दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या सहा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार जाहीर होणे बाकी आहे. उत्तर मध्य मुंबईत भाजपाला पूनम महाजन यांना उमेदवारी द्यायची नसून पर्यायी उमेदवाराचा शोध सुरू असल्याने उमेदवारी जाहीर होऊ शकली नाही मात्र उर्वरित पाच जागांवर एकमत होऊ शकले नसल्याने जागा वाटप रखडले आहे.
नाशिक मतदारसंघावर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपनेही दावा केला आहे. भाजपला ठाणे, दक्षिण मुंबई आणि पालघर या तीन जागा हव्या असून मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेकडे असलेल्या नाशिकसह या तीनही जागा सोडायला तयार नाहीत. तर उत्तर पश्चिम मुंबईतून आमदार रवींद्र वायकर यांची उमेदवारी शिंदे गटाने निश्चित केली असली तरी ती जाहीर केलेली नाही. मात्र, उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत असल्याने आणि प्रचारासाठी कमी दिवस मिळणार असल्याने इच्छुकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेताना मंत्री छगन भुजबळ यांनीही उमेदवारी जाहीर करण्यास विलंब झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
मुंबईत काँग्रेसही उमेदवारांच्या शोधात
मुंबईमध्ये काँग्रेसला उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई या दोन जागा मिळाल्या आहेत. मात्र या दोन्ही ठिकाणी काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. उत्तर मुंबई हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जात असून या ठिकाणी केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे निवडणूक लढवित आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेसला सक्षम उमेदवार हवा असून त्याचा शोध सुरू आहे. शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवावी असा काँग्रेसमधील वरिष्ठांचा प्रयत्न आहे.
मात्र ते काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास उत्सुक नाहीत. तर उत्तर मध्य मुंबईतून माजी मंत्री नसीम खान यांना काँग्रेसमधूनच विरोध आहे विरोध आहे. नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास भाजप तेथे हिंदू – मुस्लिम अशी लढत उभी करून हिंदू मतांचे ध्रुवीकरण करेल आणि त्याचा फटका बसेल, असे मुंबई काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नसीम खान यांच्या उमेदवारीला ब्रेक बसला आहे. आता काँग्रेस कोणता उमेदवार देते याबाबत उत्सुकता आहे.