कोल्हापूर : गडहिंग्लजला उद्यापासून हेल्मेट सक्ती
गडहिंग्लज; प्रवीण आजगेकर : गेल्या पंधरा दिवसांपासून गडहिंग्लज शहरातील वाहतुकीला शिस्त लावणार्या प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी हर्षवर्धन बी. जे. यांनी दि. २६ एप्रिलपासून गडहिंग्लज पोलिस ठाण्याच्या हद्दीत विना हेल्मेट प्रवास करणार्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे शुक्रवारपासून गडहिंग्लजला विनाहेल्मेट याल तर दंडास पात्र ठराल, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात उद्यापासूनच कारवाई सुरु होणार असल्याने वाहनधारक कसे सामोरे जातात, हे पाहावे लागणार आहे.
तालुक्यात संकेश्वर-बांदा राष्ट्रीय महामार्गासह इतर प्रमुख रस्त्यांवर वाहनधारकांचा वेग आपोआपच वाढत आहे. याचे दुष्परिणाम जाणवत असून, गेल्या काही दिवसांपासून अपघातांची संख्या वाढली आहे. या अपघातांमध्ये डोक्याला गंभीर इजा होऊन दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांचा अभ्यास करुन परिविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक हर्षवर्धन यांनी दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्याचे धोरण अवलंबले आहे. गडहिंग्लज शहरासह पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व मोटारसायकलस्वारांनी हेल्मेट परिधान करावे, अन्यथा कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकातून कळविले आहे. गडहिंग्लज शहरात महिनाभरापासून वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात दंडाला सामोरे जावे लागले असून, आता हेल्मेट सक्तीच्या निर्णयामुळे पुन्हा यामध्ये वाढ होणार आहे.
हेही वाचा :
28 धरणे कोरडी; 7,072 गावे-वाड्या टँकरग्रस्त!
शिवछत्रपती-ताराराणी यांचा आज रथोत्सव
पंतप्रधान मोदी यांची सभा विराट होणार; पालकमंत्री मुश्रीफ यांचा विश्वास