खातरजमा करूनच घ्या प्रवेश; पुणे विद्यापीठाचा ‘हा’ महत्वाचा सल्ला
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असण्याचा दावा करणार्या महाविद्यालयांची आणि शिक्षण संस्थांची विद्यार्थ्यांनी व्यवस्थित माहिती आणि खातरजमा करूनच तेथे प्रवेश घ्यावा. प्रवेश घेण्यापूर्वी कॉलेजला, विद्यापीठ आणि शिखर संस्थांच्या मान्यता आहेत का, याची माहिती घेऊनच प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
राज्य मंडळ आणि इतर मंडळांकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या काही दिवसांत जाहीर होणार आहे. या निकालानंतर पुणे विद्यापीठाशी संलग्न असणार्या शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी उत्सूक असतात. विद्यापीठाच्या नावाचा लौकीक राज्यात आणि देशातील इतर भागांत असल्याने, मोठ्या संख्येने विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांना कॉलेजांची आणि शिक्षण संस्थांची माहिती नसते.
याचाच फायदा काही बोगस आणि अनधिकृत पद्धतीने चालणार्या कॉलेजांकडून घेण्यात येत आहे. पुण्यासोबतच नगर आणि नाशिक जिल्ह्यात अशा कॉलेजांची संख्या आहे. या कॉलेजांमध्ये प्रवेश करून देणार्या काही त्रयस्थ संस्था आणि एजंटही कायर्रत आहेत. या संस्थांच्या आणि एजंटांच्या आमिषांना बळी पडून विद्यार्थ्यांची फसवणूक होत असून, त्यांचा प्रवेश बोगस कॉलेजांमध्ये होत असल्याचे काही घटनांमुळे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी विद्यार्थी आणि पालकांना परिपत्रकाद्वारे आवाहन केले आहे.
सूचना वाचा, सतर्क व्हा!
महाविद्यालय किंवा शिक्षण संस्थेत प्रवेश घेताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी अभ्यासक्रमाला संलग्नता असलेल्या पत्राची खातरजमा करावी.
प्रवेश प्रक्रियेसाठी वापरण्यात आलेला स्वतःचा पासवर्ड, ई-मेल आयडी, ओटीपी इत्यादी कोणालाही शेअर करू नये.
केंद्रीय पद्धतीने व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयामधील किंवा संस्थांमधील प्रवेश केंद्रीय पद्धतीने होत असल्याचे त्या प्रवेश नियंत्रण समितीच्या वेबसाईटवर जाऊन प्रत्यक्ष माहिती घ्यावी.
विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करण्यापूर्वी स्वतः विहित पात्रता धारण करत असल्याची खातरजमा करून घ्यावी.
अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना अभ्यासकमाची मान्यता व निर्धारित शुल्क याची खातरजमा करण्यात यावी.
शुल्क भरण्याची कार्यवाही महाविद्यालय किंवा संस्थेच्या खात्यामार्फतच करावी. विद्यार्थ्यांनी शुल्क कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक बँक खात्यावर ट्रान्सफर करू नयेत.
शैक्षणिक वर्षाचे शुल्क भरण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी जाहीर केलेल्या योजनांचा
लाभ घेण्यासाठी महाविद्यालयांकडून संपूर्ण माहिती घ्यावी.
एकावर एक मोफत अशी कोणतीही योजना नाही
कोणतीही संयुक्तिक व्हॅल्यू अॅडिशन ऑफर (एकावर एक मोफत) अशा स्वरूपाच्या कोणत्याही योजना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून महाविद्यालय/ संस्थांमधील अभ्यासक्रमासाठी दिल्या जात नाहीत. कृपया अशा प्रकारच्या प्रलोभनास बळी पडू नये. विद्यार्थ्यांनी स्वतःहून अशा अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यास त्यास संबंधित विद्यार्थी पूर्णतः जबाबदार राहील, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे.
हेही वाचा
शिवछत्रपती-ताराराणी यांचा आज रथोत्सव
मुंबईतील अँटॉप हिल परिसरात सिलिंडरचा स्फोट; वृद्धाचा मृत्यू
डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा प्राचार्य कणबरकर पुरस्काराने आज सन्मान