दिल्ली कॅपिटल्सचा रोमांचक विजय
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : ऋषभ पंतची 88 धावांची धमाकेदार खेळी व अक्षर पटेलच्या 66 धावांच्या झंझावातामुळे दिल्ली कॅपिटल्सने घरच्या मैदानावरील लढतीत गुजरात टायटन्सचा पराभव केला. मात्र, यासाठी त्यांना शेवटच्या षटकापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर दिल्लीने निर्धारित 20 षटकांत 4 बाद 224 धावांचा डोंगर रचला, तर प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने 20 षटकांत 8 बाद 220 धावांपर्यंत मजल मारली.
विजयासाठी 225 धावांचे कठीण आव्हान असताना गुजराततर्फे साई सुदर्शन (39 चेंडूंत 65) व डेव्हिड मिलर (23 चेंडूंत 55) यांनी शानदार अर्धशतके झळकावले. सलामीवीर साहाने 39 धावा केल्या. तळाच्या क्रमवारीत राशीद खान (11 चेंडूंत 21) व साई किशोर (6 चेंडूंत 13) यांनी जोरदार फटकेबाजी केली; पण तोवर हा सामना त्यांच्या हातातून सुटला होता. दिल्लीतर्फे रसिख सलामने 44 धावांत 3, तर कुलदीप यादवने 29 धावांत 2 बळी घेतले. तत्पूर्वी, पंतने गुजरात टायटन्सच्या जवळपास प्रत्येक गोलंदाजाचा चौफेर समाचार घेत पॉवर हिटिंगचा धडाका कायम राखला, वास्तविक, पॉवर- प्ले षटकांपूर्वीच 3 आघाडीचे फलंदाज गमावल्याने दिल्लीची खराब सुरुवात झाली होती. मात्र, पंतने खेळाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेत या सामन्याचा सर्व नूरच पालटून टाकला. पंत व ट्रिस्टियन स्टब्ज (नाबाद 26) यांनी शेवटच्या काही षटकांत गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांची केलेली धुलाई तर निव्वळ लाजवाब ठरली.
गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्लीला प्रथम फलंदाजीला पाचारण केले आणि पृथ्वी शॉ 11, जेक फ्रेझर मॅकगर्क 23 व शाय होप 5 स्वस्तात बाद झाल्याने त्यांची एकवेळ 5.4 षटकांत 3 बाद 44 अशी स्थिती झाली. मात्र, तिसर्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या अक्षर पटेलने धडाकेबाज फलंदाजी साकारत दडपण दूर सारले, तर ऋषभ पंतने याच मोमेंटमचा पुरेपूर फायदा घेत गुजरातच्या गोलंदाजांवर सातत्याने वर्चस्व गाजवले. अक्षर पटेल व ऋषभ पंत यांनी चौथ्या गड्यासाठी 113 धावांची शतकी भागीदारी साकारत दिल्लीच्या द्विशतकी धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला. कॅपिटल्सला सलग दोन विजयांनंतर मागील लढतीत सनरायजर्स हैदराबादविरुद्ध 67 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या पार्श्वभूमीवर या लढतीत विजयाच्या ट्रॅकवर परतणे त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाचे होते.
राशीद झुंजला; पण…
शेवटच्या षटकात विजयासाठी 19 धावांची आवश्यकता असताना राशीद खानने पहिल्या दोन चेंडूंवर दोन चौकार, तर पाचव्या चेंडूवर लाँगऑफकडे शानदार षटकार खेचला होता. मात्र, उर्वत तीन चेंडूंवर त्याला एकही धाव घेता आली नाही आणि या अखेरच्या टप्प्यात गुजरातची निराशा झाली.
हेही वाचा :
T20 World Cup : टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची निवड! पठाणने सॅमसन, राहुल, गायकवाडला दिला डच्चू
शिवम दुबेच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी १००० धावा पूर्ण
कर्णधारपदाचे दडपण जाणवले नाही : ऋतुराज गायकवाड