मुंबई : मालाड येथे शौचालयाच्या टाकीत पडून दोघा कामगारांचा मृत्यू; एक गंभीर
मालाड, Bharat Live News Media वृत्तसेवा : मालाडच्या पूर्व भागातील व्हॅलेंटाईन अपार्टमेंटजवळ शौचालयाच्या टाकीत पडून दोघा कामगारांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहे. जखमीवर ट्रॉमा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मालाडच्या पूर्व भागात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या शौचालयाची टाकी सफाई करण्यासाठी राजू (वय ५०) हा कामगार गेला असता त्याचा टाकीत पडून मृत्यू झाला. त्याला वाचवण्यासाठी लागतच्या झोपडपट्टीमधून जावेद ( वय ३५) व आकिब हे दोघे कामगार गेले. यातील जावेदचा गुदमरून मृत्यू झाला. तर आकिब या कामगाराची स्थिती गंभीर आहे. तत्पुर्वी घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तिघांना टाकीतून बाहेर काढले. रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी राजू व जावेदला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. आकिब याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.