आईच्या ऑपरेशनसाठी त्याने फोडले शेजार्याचेच घर;..असा लागला गुन्ह्याचा छडा
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : शेजार्याचे घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरी करणार्या चोरट्याला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. आर्थिक चणचण व आईच्या ऑपरेशनसाठी लागणार्या पैशांसाठी त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरट्याकडून सव्वासात लाखांचे दागिने जप्त केले आहेत. शेजारचाच घरफोडी करणारा निघाल्याने पोलिसदेखील अवाक झाले. सहा महिन्यांच्या प्रयत्नानंतर पोलिसांना या गुन्ह्याचा छडा लागला आहे. दीपक नामदेव पाटोळे (वय 41) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा नोंद होता. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, पोलिस अंमलदार संतोष जाधव व त्यांच्या पथकाने केली आहे.
दीपकचा हा पहिलाच गुन्हा आहे. तो त्याच्या आईसोबत राहतो. दरम्यान, दीपकची आर्थिक चणचण सुरू होती, तर दुसरीकडे आईचे आजारपणही सुरू होते. आईचे ऑपरेशन करायचे होते. तो बिबवेवाडीतील बहुमजली सोसायटीत सहाव्या मजल्यावर राहण्यास आहे. याच काळात (दि. 28 सप्टेंबर 2023 ते 2 ऑक्टोबर 2023) शेजारी राहणारे एक कुटुंब त्यांच्या मूळ गावी सोलापूर येथे गेले होते. ही संधी साधत अज्ञाताने हॉलच्या बाल्कनीच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून सोन्याचे दागिने व रोकड चोरून पसार झाला होता. गुन्हा नोंद झाल्यानंतर बिबवेवाडी पोलिसाकंडून या गुन्ह्याचा तपास सुरू होता. सीसीटीव्ही, बातमीदार, तसेच तांत्रिक विश्लेषण अशा सर्व बाजूंनी चोरट्याचा माग सुरू केला होता. पण, गेल्या सहा महिन्यांपासून या गुन्ह्याचा छडा लागत नव्हता. परंतु, पोलिस चोरट्याचा माग काढणे सोडतील ते पोलिस कसले. पोलिस क्लृप्त्या अन् वेगळी पद्धत वापरत बिबवेवाडी पोलिसांनी अखेर छडा लावला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या.
..असा लागला गुन्ह्याचा छडा
दीपकची परिस्थिती हालाकीची आहे. गुन्हा घडल्यानंतर काही दिवसांनीच दीपक मोबाईल, टीव्ही तसेच इतर वस्तू अशा अनेक नवनवीन वस्तू घरी आणत होता. दीपकच्या राहणीमानात झालेला अचानक बदल पाहून पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी आधी तांत्रिक तपास केला आणि इतर माहिती काढली. त्यात आणखीनच संशय बळावला. पोलिसांनी दीपकला ताब्यात घेत सखोल तपास केला असता दीपकने गुन्ह्याची कबुली दिली.
हेही वाचा
चैत्री पौर्णिमेनिमित्त जेजुरीत भाविकांची गर्दी : खंडोबा देवाला दवण्याची पूजा
प्रवाशाने विमानातून बॅगेत लपवून आणलेले 10 अॅनाकोंडा जप्त
दूषित पाणी पुरवठा; टंचाईग्रस्तांची केली जातेय थट्टा! नागरिकांचा संताप