पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम उषा) योजनेअंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित तीन महाविद्यालयांची प्रत्येकी पाच कोटी रुपयांच्या निधीसाठी निवड झाली आहे. त्यात मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड महाविद्यालयाचा समावेश आहे. देशभरातील उच्च शिक्षण संस्थांतील गुणवत्ता सुधारणे, उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा) ही योजना 2013 मध्ये सुरू केली. त्यानंतर 2018 मध्ये योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला. तर 2023 मध्ये योजनेचे नाव बदलून पीएम-उषा नावाने योजनेचा तिसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. या अनुदानासाठी भारतभरातून अंदाजे 2300 प्रकल्प सादर झाले.
महाराष्ट्रातून 620 प्रकल्प सादर झाले, त्यापैकी 43 प्रकल्प मंजूर झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड, नाशिक जिल्ह्यातील भोसला लष्करी महाविद्यालय, नगर जिल्ह्यातील सोनाई येथील मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांची निवड झाली. मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंडच्या निवडीबाबत प्राचार्य डॉ. संजय खरात म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार यांच्या प्रत्येकी 60 टक्के आणि 40 टक्के अशा संयुक्त अर्थसहाय्यातून पीएम-उषा योजनेत महाविद्यालयाला पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प तयार करण्यात आला. या अनुदानामुळे महाविद्यालयात नवीन भौतिक सुविधा निर्माण करता येतील. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व घटकांच्या क्षमतांचा विकास साधणे शक्य होईल. महाविद्यालयाला या योजनेसाठी क्षमता विकसन केंद्र म्हणून काम करता येईल. त्याचा फायदा पुण्यातील सर्व महाविद्यालयांना होऊ शकेल.
हेही वाचा
Dhule Bribe News | धुळ्यात लाचखोर पोलिस उपअधीक्षक गजाआड
आरटीई प्रवेशाच्या ‘पॉवर गुल’विरोधात आंदोलन; काय आहे ‘पॉवर गुल’?
शिवम दुबेच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी १००० धावा पूर्ण