डेन्मार्कमधील शेतात सापडली अलेक्झांडरची ब्राँझ प्रतिमा

कोपेनहेगन : डेन्मार्कमधील एका शेतात मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने धातूच्या वस्तूंचा शोध घेणार्‍या काहीजणांना जगज्जेता अलेक्झांडरची छोटी प्रतिमा सापडली. ही प्रतिमा ब्राँझ धातूमध्ये कोरलेली असून, ती 1,800 वर्षांपूर्वीची आहे. फिन इब्सेन आणि लार्स डॅनिएल्सेन यांना डेन्मार्कच्या झियालँड या बेटावरील रिंगस्टेड या शहरात असलेल्या शेतामध्ये ही प्रतिमा सापडली. त्यांनी ही ब्राँझ प्रतिमा म्युझियम वेस्ट झियालँडकडे सोपवली. ही …

डेन्मार्कमधील शेतात सापडली अलेक्झांडरची ब्राँझ प्रतिमा

कोपेनहेगन : डेन्मार्कमधील एका शेतात मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने धातूच्या वस्तूंचा शोध घेणार्‍या काहीजणांना जगज्जेता अलेक्झांडरची छोटी प्रतिमा सापडली. ही प्रतिमा ब्राँझ धातूमध्ये कोरलेली असून, ती 1,800 वर्षांपूर्वीची आहे.
फिन इब्सेन आणि लार्स डॅनिएल्सेन यांना डेन्मार्कच्या झियालँड या बेटावरील रिंगस्टेड या शहरात असलेल्या शेतामध्ये ही प्रतिमा सापडली. त्यांनी ही ब्राँझ प्रतिमा म्युझियम वेस्ट झियालँडकडे सोपवली. ही ब्राँझची प्रतिमा अवघ्या 1 इंच व्यासाची आहे. त्यामध्ये कुरळ्या केसांचा आणि मुकुट परिधान केलेला अलेक्झांडर द ग्रेटचा चेहरा कोरलेला आहे. त्याच्या प्रतिमेतील विविध वैशिष्ट्यांवरून ही प्रतिमा अलेक्झांडरचीच आहे, हे संशोधकांनी तत्काळ ओळखले.
या मॅसेडोनियन सम्राटाने वयाच्या 32 व्या वर्षी झालेल्या मृत्यूपर्यंत बाल्कन देशांपासून भारताच्या सीमेपर्यंत साम्राज्य निर्माण केले होते. ही प्रतिमा कॅराकल्ला या रोमन सम्राटाच्या काळातील आहे. तो स्वतः अलेक्झांडरपासून अतिशय प्रभावित होता. या सम्राटाने इसवी सन 198 ते 217 या काळात राज्य केले. विशेष म्हणजे तो अनेक वेळा अलेक्झांडरसारखी वेशभूषा करून स्वतःला अलेक्झांडरचा नवा अवतार म्हणवून घेत असे!