Post Office Scheme : पोस्टाची ग्रामसुरक्षा योजना; वृद्धापकाळात बनेल आधार
[author title=”मेघना ठक्कर” image=”http://”][/author]
नोकरदार असो किंवा व्यावसायिक प्रत्येकासाठी बचत करणे आवश्यक असते; पण बचत केलेली रक्कम योग्य ठिकाणी गुंतवणे देखील महत्त्वाचे असते. यासाठी गुंतवणूक करताना विविध पर्यायांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
चांगली गुंतवणूक करायची असेल किंवा बचत सुरू करण्याचा विचार करत असाल, तर बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यासाठी टपाल खात्याचा पर्यायही चांगला परतावा देणारा ठरत आहे. पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणार्या योजनांना असणारी लोकप्रियता वाढत आहे. या योजना जोखीममुक्त गुंतवणुकीच्या अंतर्गत येतात कारण, योजनांमधील ठेवी बाजाराच्या जोखमीच्या अधीन नाहीत. गुंतवणुकीवर जोखीममुक्त परतावा मिळत असल्याने लाखो लोक पोस्ट ऑफिस योजनांना प्राधान्य देतात. यापैकी एक ‘ग्रामसुरक्षा योजना’ आहे जी तुमच्या वृद्धापकाळात आधार बनू शकते.
19 ते 55 वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक टपाल खात्याच्या या योजनेत गुंतवणूक करू शकतात. यामध्ये एका वर्षात 10,000 ते 10 लाख रुपये गुंतवता येऊ शकतात. गुंतवणूक मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर केली जाऊ शकते.
या योजनेत गुंतवणूकदारांना वयाच्या 80 व्या वर्षी बोनससह परतावा मिळेल. एखाद्या व्यक्तीचे वय 80 वर्षांपूर्वी निधन झाले, तर त्याच्या कायदेशीर वारसाला ही रक्कम मिळेल.
ग्रामसुरक्षा योजनेत गुंतवणूक सुरू केल्यानंतर चार वर्षांनीच कर्जाची सुविधा मिळू शकते. पाच वर्षांनंतर गुंतवणुकीवर बोनसचा दावा केला जाऊ शकतो. तुम्ही गुंतवणूक सुरू केल्यानंतर तीन वर्षांनी गुंतवणूकही सरेंडर करू शकता. म्हणजे तुम्ही गुंतवणूक थांबवू शकता.
एखाद्या गुंतवणूकदाराने वयाच्या 19 व्या वर्षी 10 लाख रुपयांची ग्रामसुरक्षा योजना खरेदी केली, तर त्याला 55 वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला 1,515 रुपये प्रीमियम भरावा लागेल, म्हणजे सुमारे 50 रुपये प्रतिदिन. पोस्ट ऑफिस ग्रामसुरक्षा योजनेत गुंतवणूक करणार्या लाभार्थ्याला 80 वर्षे पूर्ण झाल्यावर पॉलिसीची संपूर्ण रक्कम म्हणजेच 35 लाख रुपये सुपूर्द केले जातील.
भविष्यासाठी मोठी रक्कम जमा करायची असेल किंवा वयाच्या उत्तरार्धामध्ये हाताशी भरपूर पैसा हवा असे वाटत असेल तर अशा योजनांमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. कारण, यामध्ये तुम्हाला उत्तम परतावाही मिळतो आणि जोखीमदेखील कमी असते.