विशाल पाटील मैदानात; सांगलीत तिरंगी सामना
सांगली; Bharat Live News Media वृत्तसेवा : सांगली लोकसभेच्या जागेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला. त्यांनी माघार न घेतल्याने अपक्ष विशाल पाटील, महाविकास आघाडीचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील व महायुतीतर्फे खासदार संजय पाटील यांच्यात तिरंगी लढत अटळ झाली.
विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याचे कळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी कार्यालयासमोर एकच जल्लोष केला. सांगली लोकसभा निवडणुकीसाठी विशाल पाटील यांचे सुरुवातीपासूनच प्रयत्न सुरू होते. मात्र, पै. चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘ते दिल्लीला जातील’ अशी घोषणा केली. त्यानंतर त्यांनी मिरज येथे सभा घेऊन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली. तरीसुद्धा विशाल पाटील यांचे जोरदार प्रयत्न सुरू होते. त्यासाठी काँग्रेस नेते व आमदार विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत, काँग्रेस शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील यांनी मुंबई, दिल्ली, नागपूर येथे जोरदार प्रयत्न केले.
या घडामोडी सुरू असताना खासदार संजय राऊत यांनी दोनवेळा जिल्हा दौरा करून चंद्रहारच उमेदवार म्हणून दावा करीत
प्रचार सुरू केला. त्यावेळी विशाल पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत अपक्ष अर्ज दाखल केला. भाजपविरोधात एकास एक लढत होण्यासाठी पक्षाचा एबी फॉर्म मिळेल, अशी आशा शेवटपर्यंत त्यांना होती. किमान अर्ज माघारीत चंद्रहार पाटहील यांची उमेदवारी मागे घेतली जाईल, असे त्यांच्या समर्थकांना वाटत होते. मात्र यातील कोणत्याच गोष्टी झाल्या नाहीत. निवडणूक लढवायचीच भूमिका घेतल्याने त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे अखेर विशाल पाटील यांची बंडखोरी कायम राहिली.
माघार घेण्यासाठी दबाव
विशाल पाटील यांनी माघार घ्यावी, यासाठी महाविकास आघाडी व काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र विशाल पाटील यांचे मन वळवण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश आले. काँग्रेस नेत्यांची शिष्टाई अयशस्वी ठरली.
विधानपरिषद देण्याचे आश्वासन?
विशाल पाटील यांनी लोकसभेतून माघार घ्यावी, त्यांना राज्यसभेत पाठवू, असे जाहीर आश्वासन खासदार राऊत यांनी दिले होते. गेल्या काही दिवसात विशाल यांनी माघार घ्यावी, त्यांना विधानपरिषद देण्यात येईल, असे आश्वासनही दिल्याची चर्चा होती. मात्र त्यांनी जनतेच्या पाठिंब्यावर पद मिळविणार असल्याची घोषणा केली.
पक्षाकडून कारवाईचे संकेत
विशाल पाटील भूमिकेवर ठाम राहिल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत पक्षाने दिले आहेत. त्यामुळे आता काँग्रेस काय कारवाई करणार, याकडे लक्ष आहे. विशाल पाटील यांना आतापर्यंत पाठिंबा देणारे स्थानिक आमदार काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विश्वजित कदम यांनी महाविकास आघाडीच्या मोठ्या हितासाठी पाटील यांनी माघार घ्यावी, असे म्हटले होते.
विशाल यांनी चिन्ह मागितले एक, मिळाले दुसरे
उमेदवारी अर्ज निश्चित झाल्यानंतर विशाल पाटील यांना कोणते चिन्ह मिळणार, याकडे सुद्धा लक्ष होते. विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरताना शिट्टी, टेबल आणि गॅस सिलिंडर या चिन्हांची मागणी केली होती. मात्र, मागणी केलेल्या तिन्ही चिन्हांपैकी एकही चिन्ह मिळालेलं नाही. त्यांना लिफाफा हे चिन्ह मिळाले आहे. दुसरीकडे, विशाल पाटील यांनी मागणी केलेले शिट्टी चिन्ह स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळाले आहे.
रिंगणातले उमेदवार…
चंद्रहार पाटील, टिपूसुलतान पटवेगार, संजय पाटील, आनंदा नालगे, पांडुरंग भोसले, महेश खराडे, सतीश कदम, अजित खंदारे, अल्लाउद्दीन काजी, डॉ. आकाश व्हटकर, जालिंदर ठोमके, तोहिद मोमीन, दत्तात्रय पाटील, नानासोा बंडगर, प्रकाश शेंडगे, विशाल पाटील, रवींद्र सोलनकर, शशिकांत देशमुख, सुवर्णा गायकवाड, संग्राम मोरे.