राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात शेतकरी, नोकरभरतीला प्राधान्य
मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : राष्ट्रासाठी राष्ट्रवादी हे ब्रीद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी आपला लोकसभा निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला. कृषिमालाच्या हमीभावाची कडक अंमलबजावणी, शेतकर्यांना अखंडित वीज देण्यासाठी सौर-पवनऊर्जेला प्राधान्य, किसान सन्मान निधीत वाढ, पारदर्शक नोकर भरतीला प्राधान्य आणि पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची हमी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्याद्वारे दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि पक्षाचे स्टार प्रचारक प्रमुख धनंजय मुंडे आदींच्या उपस्थितीत या जाहीरनाम्याचे लोकार्पण करण्यात आले.
जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे
– मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा.
– स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्यासाठी केंद्राकडे करणार शिफारस.
– शेतकर्यांना अखंडित वीज मिळावी यासाठी सौरऊर्जा,
पवनऊर्जा, जलविद्युत प्रकल्पांना बळकटी देणार.
– कृषी पीक विमा योजनेची व्याप्ती वाढवून पीक विमा योजना अधिक शेतकरीस्नेही करण्यावर भर देणार.
– किसान सन्मान निधी योजनेतून प्रत्येक शेतकर्याला केंद्र सरकारकडून वर्षाला
सहा हजार रुपये, तर राज्य सरकारकडूनही सहा हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये मिळतात. यामध्ये भरीव वाढ करणार.
– मुद्रा योजनेतून 20 लाखांपर्यंत कर्ज.
– महाराष्ट्राला बनवणार कौशल्य विकासाची राजधानी.
– विश्वकर्मा योजनेची व्याप्ती वाढविणार.
– बलुतेदारांसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उद्योगवाढीचे प्रयत्न करणार.
– कौशल्य विकास प्रशिक्षित युवकांना खासगी कंपन्यात कंत्राटी म्हणून मिळत असलेल्या मानधनात वाढ करून ते दरमहा 20 हजार रुपये पर्यंत वाढ.
– मातृत्व सन्मानाचा क्रांतिकारी निर्णय देशाच्या पातळीवर राबविणार.
– लेक लाडकी या योजनेची व्याप्ती आणि विस्तार वाढ.
– वर्किंग वुमन होस्टेलची संख्या वाढविणार.
– 60 वर्षावरील नागरिकांना रेल्वे आणि मेट्रो प्रवासात देशभरात 50 टक्के सवलत.
– 70 वर्षे वयावरील नागरिकांना आयुष्मान भारत योजना.
– अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील युवकांना उद्योग उभारणीसाठी प्रशिक्षण.
– अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठींच्या शैक्षणिक संस्थांना अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठीचे धोरण आखणार.
– जातनिहाय जनगणना.
– राष्ट्रीय स्तरावर मौलाना आझाद संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, उद्योग व रोजगाराच्या संधी लाभतील यासाठी निधी व उपायोजनांची अंमलबजावणी.
– उर्दू माध्यमाच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सेमी इंग्रजी शाळांचा दर्जा.
– पीएम आवास योजनेत नव्याने तीन कोटी घरे.
– आरोग्य, शिक्षण, स्वच्छता व पर्यावरण आणि रोजगार ही पक्षाची ग्रामविकासाची पंचसूत्री.
– प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर प्रधानमंत्री शेत शिवार – पांदन रस्ता.
– एम्सच्या धर्तीवर माफक आणि दर्जेदार आरोग्यसेवा.
– राष्ट्रीय स्तरावर नदी जोड प्रकल्प. मोठ्या प्रमाणात नदी शुद्धीकरण प्रकल्प.
– कृष्णा – भीमा रुंदीकरण, नार-पार योजना, पश्चिम घाटातील पावसाचे समुद्रात वाहून जाणारे पाणी दुष्काळग्रस्त भागात वळवणे असे महत्त्वाकांक्षी, दूरगामी सकारात्मक परिणाम करणारे राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न.
– वनक्षेत्रात पाण्याचे साठे निर्माण व्हावेत यासाठी कायद्यात सुधारणा.