तडका : अंगात नाही बळ

आपल्या राज्यातील मराठी भाषा ही अनेक कारणांनी समृद्ध होत गेलेली आहे. दर बारा कोसावर भाषा बदलते म्हणतात, त्याप्रमाणे प्रत्येक विभागात वेगवेगळ्या म्हणी सर्रास वापरल्या जातात. अशीच एक म्हण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि ती म्हणजे ‘अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ’ ही होय. सध्या राजकारणात या म्हणीचा प्रत्यय जागोजागी येत आहे. लोकशाहीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य …

तडका : अंगात नाही बळ

आपल्या राज्यातील मराठी भाषा ही अनेक कारणांनी समृद्ध होत गेलेली आहे. दर बारा कोसावर भाषा बदलते म्हणतात, त्याप्रमाणे प्रत्येक विभागात वेगवेगळ्या म्हणी सर्रास वापरल्या जातात. अशीच एक म्हण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि ती म्हणजे ‘अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ’ ही होय. सध्या राजकारणात या म्हणीचा प्रत्यय जागोजागी येत आहे. लोकशाहीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे बोलण्याचे स्वातंत्र्य आणि ते कोणीही कुणाकडूनही हिरावून घेऊ शकत नाही. बोलण्याचे स्वातंत्र्य आहे; पण ते ऐकणार तरी कोण, हा प्रश्न उभा राहतो. मीडियाने या बोलघेवड्या लोकांचा हा प्रश्न सोडवला आहे. कुणीही नेता काहीही बोलायला लागला की, माईक घेऊन मीडियावाले त्यांच्याभोवती गराडा घालतात. मीडिया सभोवताल दिसला की, काही लोकांच्या अंगात येते आणि ते वाटेल ते बडबड करायला सुरू करतात. भारताच्या संसदेमध्ये 548 खासदार निवडून येत असतात. त्या अर्थाने 275 खासदार ज्याच्याकडे आहेत, तो पंतप्रधान होण्याची शक्यता असते. जेमतेम 20 जागा लढवणारे किंवा अगदीच सात-आठ जागा लढवणारे पक्षही आमचाच नेता पंतप्रधान होणार, अशा वल्गना करत आहेत. आहे की नाही गंमत!
तुम्हास असे वाटेल की, हे केवळ आपल्या राज्यात सुरू आहे; परंतु नाही, हे देशभर सर्वत्र असेच सुरू आहे. दक्षिणेतील एक प्रादेशिक पक्ष एक डझन जागा लढवत आहे. त्यातील तीन खासदार म्हणून निवडून येण्याची शक्यता आहे; पण हा पक्ष दररोज उत्तरेवर स्वारी करून दिल्लीचे सिंहासन ताब्यात घेण्याचे स्वप्न पाहत आहे. जेमतेम एका ऑटोमधून जातील इतके खासदार असले तरी नेत्यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत आहेत. जनतेला गृहीत धरून काय वाटेल ती बडबड करायची आणि विरोधी गटाचा सामना आपण करू शकत नाही, हे माहीत असल्यामुळे बोलण्यामधून चिमटा घेऊन पळून जायचे, हा प्रकार सर्वत्र सुरू आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये पूर्वी काय घडले, याचे खरे आणि काल्पनिक असे गौप्यस्फोट केले जात असतात. कुणी कुणाला कोणते वचन दिले होते, कोण कोणाला कोणत्या खोलीत काय बोलले होते, कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला होता, कोणी कोणाला दगा फटका केला होता, या गोष्टींची चर्चा प्रत्येक मतदारसंघात होत आहे.
ज्यांच्याकडे मुद्दे नाहीत, ते लोक नको तो इतिहास उकरून काढत जनतेचे लक्ष तिसरीकडेच वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकसभा निवडणुकीचा प्रचार महत्त्वाचा असतो. खरे तर जनतेच्या लोकशाहीबद्दल संकल्पना प्रगल्भ करण्याची ती एक संधी असते. गेली पाच वर्षे आपण काय केले? पुढील पाच वर्षे आपण काय करणार आहोत? याचा आराखडा मांडणे अपेक्षित असते. ज्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत, ते लोक अमुकतमुक पक्षाने आमच्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसला, अमुकतमुक व्यक्तीने आमच्या काकांशी फितुरी केली, अशा जुनाट आणि कालबाह्य झालेल्या पद्धतीने प्रचार करत आहेत, हे देशाचे आणि राज्याचे दुर्दैव म्हणावे लागेल. जनतेला कुणाच्याही वडिलांच्या, काकांच्या, मामाच्या, आजोबांच्या पुण्याईशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही. जो विकास करेल किंवा करण्याची शक्यता असेल, अशाच पक्षाला भरघोस मतदानावर होणार आहे.