11 मतदारसंघांत दुरंगी-तिरंगी लढती
मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांतील लढतींचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बहुतेक मतदारसंघांत दुरंगी व तिरंगी लढती होत असल्याचे स्पष्ट झाले. लक्षणीय म्हणजे सांगलीत विशाल पाटील यांनी बंडाचा झेंडा कायमच ठेवल्याने तेथे आता तिरंगी लढत होणार आहे. सोलापुरात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने माघार घेतल्याने तेथे थेट लढत होणार आहे.
तिसर्या टप्प्यात महाराष्ट्रात कोल्हापूर, हातकणंगले, बारामती, सातारा, सांगली, रायगड, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या 11 मतदारसंघांत येत्या 7 मे रोजी मतदान होत आहे. त्यासाठी सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.
बारामतीत 38 उमेदवार
बारामतीत खरी लढाई सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांच्यात होणार असली, तरी त्या मतदारसंघात मात्र उमेदवारांची भाऊगर्दी आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी पात्र 46 उमेदवारांपैकी आठजणांनी माघार घेतल्याने तेथे आता 38 उमेदवार रिंगणात आहेत.
सातार्यात 16 जण आखाड्यात
सातारा लोकसभा निवडणुकीत माघारीच्या अखेरच्या दिवशी 5 जणांनी उमेदवारी अर्ज काढून घेतल्याने 16 जण निवडणूक रिंगणात रहिले आहेत. त्यामुळे सातारा लोकसभा निवडणूक बहुरंगी लढत होणार असली, तरी महायुतीचे उमेदवार खा. उदयनराजे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांच्यातच काँटे की टक्कर होणार आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये 9 उमेदवार
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नऊपैकी एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे तेथे 9 उमेदवार रिंगणात आहेत.
सोलापुरात वंचितची माघार
सोलापूर लोकसभा मतदारसंघात अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड यांच्यासह 11 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता 21 उमेदवार रिंगणात आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातून शेकापचे सचिन देशमुख यांच्यासह 6 जणांनी अर्ज मागे घेतले.
धाराशिवमध्ये 31 उमेदवार
धाराशिव मतदारसंघात आ. विक्रम काळे, बाळकृष्ण शिंदे, रहिमोद्दीन काझी, अरुण जाधवर यांनी माघार घेतल्याने आता 31 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. लातूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून तिघांनी माघार घेतल्याने आता तेथे 28 उमेदवार आहेत.