काँग्रेसला 70 वर्षांत जमले नाही ते भाजपने केले : ठाकरे
अमरावती; Bharat Live News Media वृत्तसेवा : नरेंद्र मोदी एक गोष्ट खरी बोलले आहेत. जे काँग्रेसला 70 वर्षांत जमले नाही ते त्यांनी करून दाखवले आहे. सत्तर वर्षांत जे काँग्रेसला लुटता आले नाही ते यांनी लुटून दाखवले आहे, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे. अमरावतीत महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचार सभेदरम्यान सांस्कृतिक भवनात सोमवारी ठाकरे बोलत होते.
आता लुटीचा पैसा सर्वत्र दिसतो आहे. होर्डिंग आणि जाहिरातींनी पेपर बरबटून टाकले आहेत. हा पैसा कोणी दिला आणि कुठून आला, असा सवाल ठाकरे यांनी विचारला. भाजप सरकार 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्याची गोष्ट करत आहे. 80 कोटी लोकांना धान्य देण्यापेक्षा त्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी रोजगार द्या, असेही ठाकरे म्हणाले. भाजपकडून आम्हाला हिंदुत्वाची शिकवणी लावण्याची गरज नाही. देशप्रेमाची तर तुम्ही बातच करू नका. तुमच्या रक्तामध्ये देशप्रेम आहे किंवा नाही हेच आम्हाला शोधावे लागेल, अशी टीकाही त्यांनी केली.