मविआ सरकार फडणवीस, महाजनांना अटक करणार होते; मुख्यमंत्री शिंदेंचा खळबळजनक दावा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह माजी मंत्री आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांच्या अटकेची योजना आखण्यात आली होती, असा खळबळजनक दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनीच शरद पवारांना मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचे नाव सुचवायला सांगितले, या दाव्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला आहे. …

मविआ सरकार फडणवीस, महाजनांना अटक करणार होते; मुख्यमंत्री शिंदेंचा खळबळजनक दावा

मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह माजी मंत्री आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांच्या अटकेची योजना आखण्यात आली होती, असा खळबळजनक दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनीच शरद पवारांना मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचे नाव सुचवायला सांगितले, या दाव्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला आहे. दरम्यान, ‘मविआ’ स्थापन झाल्यावरही उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत सरकार बनविण्याची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक गौप्यस्फोट केले. ते म्हणाले, फडणवीस, महाजन, शेलार व दरेकरांविरोधात प्रकरणे तयार करायची व त्यांना अटक करायची योजना महाविकास आघाडीने आखली होती. तसेच 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे काही आमदार फोडण्याचा कटही आखण्यात आला होता. या मुलाखतीत शिंदे यांनी ठाकरे यांच्या कार्यशैलीवर व त्यांनी आपल्याला दिलेल्या वागणुकीवरही ताशेरे ओढले.
मुख्यमंत्री ठाकरेंनाच व्हायचे होते
महाविकास आघाडी सरकार बनत असताना मुख्यमंत्रिपदासाठी माझे नाव जवळपास निश्चित झाले होते. मात्र, अखेरच्या क्षणी उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांच्याकडे काही माणसे पाठवून आपले नाव मुख्यमंत्रिपदासाठी सुचवायला सांगितले, असेही शिंदे या मुलाखतीत म्हणाले. ‘मुख्यमंत्री तुम्हीच व्हा’, असे पवारांनी उद्धव ठाकरेंना कधीच म्हटलेले नव्हते. स्वतः शरद पवारांनी मला हे सांगितले. शेवटी उद्धव ठाकरे पवार साहेब म्हणतायत, असे सांगत स्वतः मुख्यमंत्री झाले. बाळासाहेबांसारखे किंगमेकर व्हायचे सोडून उद्धव ठाकरे स्वतःच किंग झाले, अशी टीका त्यांनी ठाकरेंवर केली.
आदित्य ठाकरेंचा खात्यातही हस्तक्षेप
शिवसेना पक्षप्रमुख व तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनी सतत आपला अपमानच केल्याचा आरोपही शिंदेंनी केला आहे. माझे नगरविकास खातेही काढून घेण्याचा त्यांचा विचार होता. माझ्या खात्यात आदित्य ठाकरेंचा खूप हस्तक्षेप व्हायचा. सिडको, एमएमआरडीए, एमएसआरडीसीच्या बैठकाही आदित्य ठाकरे घेऊ लागले होते. मुंबईच्या नगर नियोजनावर तर माझे काही नियंत्रणच नव्हते. त्यामुळे अधिकारी वर्गाची पंचाईत होत होती. उद्धव ठाकरेंकडे तक्रार केली तर त्यांनी पुत्रप्रेमापोटी त्याची दखलही घेतली नाही. राज्यसभेचा उमेदवार निवडताना मला बाजूला ठेवले गेले हा तर कहर झाला आणि माझा संयम सुटला, अशा शब्दांत ठाकरेंविरोधात बंडामागील कारणांची माहिती त्यांनी दिली.
भाजपसोबत जाण्यास ठाकरे राजी झाले होते
महाविकास आघाडी स्थापन न करता आपणच एकत्र येऊ म्हणून फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना पन्नास वेळा फोन केला. पण तो उचलला गेला नाही. आपण पुन्हा भाजपबरोबर जाऊ, असे उद्धव ठाकरेंना मी वारंवार सांगितले. उद्धव ठाकरे होसुद्धा म्हणाले. महाविकास आघाडी स्थापन झाल्यावरसुद्धा ते भाजपसोबत जाण्याला होकार देत होते. त्यांची दिल्लीत मोदींची भेट झाली, त्यावेळीही त्यांनी तयारी दाखवली होती आणि मोदींनी यासाठी आठ दिवस दिले होते. पण निर्णय घेण्याऐवजी भाजपचेच 12 आमदार निलंबित केले गेले, असेही ते म्हणाले.
तेव्हा उशीर झाला होता
मी सुरतला जाताना वसईतल्या एका चहाच्या टपरीवरून उद्धव ठाकरेंना फोन केला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. पण वेळ निघून गेलीय, असे मी सांगितले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिल्लीतल्या भाजप नेत्यांना फोन करून आपण पुन्हा एकत्र येऊ, एकनाथ शिंदेंसोबत का जाताय असे म्हटले. पण तोपर्यंत पुलाखालून खूप पाणी वाहून गेले होते, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
आदित्यला मुख्यमंत्री बनविण्याची घाई
आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याची उद्धव ठाकरेंना खूप घाई झाली होती. मी त्यात अडथळा आहे असे त्यांना वाटत होते, असेही शिंदे म्हणाले. फडणवीस यांनी आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करून स्वतः दिल्लीच्या राजकारणात जाण्याची तयारी केली होती, या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे बोलत होते.
शिवसेना 19 जागा लढवणार
शिवसेना राज्यात 19 जागा लढवेल, असा दावाही त्यांनी केला. शिवसेना महाराष्ट्रात 16 आणि मुंबईत 3 जागांवर लढत आहे. महायुती गेल्यावेळेपेक्षा अधिक जागा जिंकेल. महायुती सरकारने गेल्या दोन वर्षांत केलेली विकासकामे व मोदी सरकारने
10 वर्षांत केलेली विकासकामे यांच्या बळावर महायुती राज्यात उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.