छत्रपती संभाजीनगर : कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन
पिंपळदरी, Bharat Live News Media वृत्तसेवा : पिंपळदरी येथील एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विहिरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपविली. पिंपळदरी शिवारात सोमवारी (दि.२२) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. संजय अनंदा चव्हाण ( ४५, रा. पिंपळदरी, ता. सिल्लोड) असे मृताचे नाव आहे.
संजय चव्हाण हे सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास जेवण करून घरातून निघून गेला होता. सायंकाळ होऊनही तो घरी परतला नसल्याने कुटुंबियांनी त्याचा गावात तसेच नातेवाईकांकडे शाेध घेतला. परंतु तो कुठेही आढळून आला नाही. दरम्यान, सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास नातेवाईकांनी त्याच्या पिपळदरी परिसरातील शेतात जाऊन पाहिले असता शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. याबाबत अजिंठा पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली. ग्रामस्थांच्या मदतीने पाेलिसांनी मृतदेह विहिरीबाहेर काढला व अजिंठा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्यावर विविध राष्ट्रीयकृत्व व खाजगी बँकेचे कर्ज असल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली. तरूण शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे पिंपळदरी पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, एक मुलगा, दोन मुली असा परिवार त्यांच्यावर अवलंबून होता.
हेही वाचा :
कोल्हापूर : नरतवडे येथे वृध्द महिलेचा दगडाने ठेचून खून
राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील लाचखोर सहाय्यक समादेशकास अटक
रत्नागिरी: चित्रकला स्पर्धेचे कारण सांगून पोहायला गेलेल्या दोन मुलांचा शीळ धरणात बुडून मृत्यू