आसाम रायफल्स राज्यातील पहिले केंद्र : माजी सैनिकांसाठी सुविधा

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
उपनगर येथे आसाम रायफल्स माजी सैनिकांसाठी केंद्र उभारण्यात आले. आसाम रायफल्स्चे महानिदेशक लेफ्टनंट जनरल प्रदीप चंद्रन नायर यांच्याहस्ते रविवारी (दि. २१) या केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. राज्यातील हे पहिलेच केंद्र असून त्यातून आसाम रायफल्सच्या माजी सैनिकांच्या कल्याणकारी सुविधा व सहाय्य सेवा प्रदान करण्यात येणार आहे.
आसाम रायफल्स माजी सैनिक दिनानिमित्त आसाम रायफल्स महासंचनालय व आसाम रायफल्स माजी सैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या केंद्राच्या लाेकार्पण सोहळ्यानिमित् आर्टिलरी सेंटर तोपची सभागृह सैनिकांचा मेळावा संपन्न झाला. आसाम रायफल्स हे देशातील सर्वात जुने व सर्वाधिक पदके प्राप्त करणारे निमलष्करी दल आहे. १८९ वर्षांहून अधिक काळ शौर्याचा व बलिदानाचा समृद्ध इतिहास असलेल्या आसाम रायफल्सने विविध मोहिमांद्वारे विशेष स्थान निर्माण केले आहे. राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे हे दल ईशान्येकडील राज्यांशी निगडीत आहे.
आसाम रायफल्स्तर्फे माजी सैनिकांच्या महत्त्वपूर्ण गरजा व त्यांच्यापुढील आव्हाने प्रभावीपणे हाताळण्यासाठी हे केंद्र चालविले जातात. ही केंद्रे नागरी जीवनात प्रवेश करणाऱ्या माजी सैनिकांना आरोग्य सेवा सहाय्य, व्यावसायिक प्रशिक्षण, समुपदेशन सेवा आणि सामाजिक समर्थनासह विविध कल्याणकारी सुविधा प्रदान करतात. नाशिकमधील केंद्राच्या माध्यमातून दलाशीनिगडीत १ हजार माजी सैनिक, वीरपत्नी तसेच सैनिकांच्या कुटूंबियांना सहाय्य केले जाणार आहे. मेळाव्याप्रसंगी अडीचशेहून माजी सैनिक, वीर नारी आणि सैनिकांचे कुटूंबिय सहभागी झाले.
माजी सैनिकांना सहाय्य
आसाम रायफल्स्कडून माजी सैनिकांना नैसर्गिक आपत्तीदरम्यान एकाचवेळी १२ हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. याशिवाय सैनिकांच्या विधवांना त्यांच्या दोन मुलींच्या लग्नासाठी २० हजार रुपयांची मदत; माजी सैनिक आणि सैनिकांच्या विधवांना ९० हजारांची वैद्यकीय मदत कोणत्याही स्वरुपात तसेच शालेय शिक्षणासाठी इयत्ता अकरावी ते बारावीसाठी वार्षिक पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. तसेच उच्च शिक्षणातील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी (एम टेक, एमबीए, बीटेक, एमबीबीएस, बीडीएस आणि तत्सम) प्रतिवर्षी १० हजार रुपये अनुदान विद्यार्थ्यांना दिले जाते.
हेही वाचा:
यापुढे अ.भा. मराठी साहित्य संमेलन मोठ्या शहरांतच; साहित्य महामंडळाचा निर्णय
‘उजनी’तील पळसनाथ मंदिराला ‘या’ कारणामळे धोका..!
Nashik Farmers News | डाळिंबबाग उन्हापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्याने लढवली शक्कल, चक्क साडेतीन एकरांवर सावली
