Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर हाेण्यासाठी दाखल याचिकेवर आज ( दि. २२) उच्च न्यायालयात सुनावणी झाली. ही याचिका न्यायालयाने फेटाळली.
केजरीवाल यांच्यावर नोंदवलेल्या फौजदारी गुन्ह्यांमध्ये अंतरिम जामिनावर सुटका करण्याची मागणी करणारी याचिका कायद्याच्या चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्याने “We the People of India” या नावाने दाखल केली होती. केवळ प्रसिद्धी किंवा फायदा नको म्हणून आपण हे शीर्षक वापरल्याचे त्याने म्हटले होते. वकील करण पाल सिंग यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली होती. केजरीवाल यांची तिहार जेलमधील सुरक्षा धोक्यात असल्याचे या याचिकेत नमूद केले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने दंडात्मक कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर ईडीने या प्रकरणी २१ मार्च रोजी केजरीवाल यांना अटक केली होती. सध्या ते तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत.
#BREAKING
⁰“Totally misconceived”: Delhi High Court dismisses PIL seeking release of Chief Minister Arvind Kejriwal on “extra ordinary interim bail”.
Court imposes Rs. 75,000 costs on petitioner “We the people of India.”#ArvindKejriwal pic.twitter.com/FdUvLDzMIN
— Live Law (@LiveLawIndia) April 22, 2024
यापूर्वीच्या सुनावणीत काय म्हणाले होते दिल्ली उच्च न्यायालय ?
दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी ( Delhi liquor policy case) ९ एप्रिल रोजी दिल्ली उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाच्या न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी केजरीवालांची याचिका फेटाळली होती. अटकेची कारवाई करण्यासाठी आवश्यक असणारे पुरेसे पुरावे ईडीकडे होते. त्यामुळेच त्यांनी केजरीवाल यांना अटक केली. राजकीय कारणे न्यायालयासमोर आणता येत नाहीत. या न्यायालयासमोरील प्रकरण हा केंद्र सरकार आणि केजरीवाल यांच्यातील संघर्षाचा नाही. तर केजरीवाल आणि ईडी यांच्यातील प्रकरण आहे. सामान्य नागरिकांसाठी एक आणि मुख्यमंत्र्यांसाठी विशेष विशेषाधिकार असे हे न्यायालय करणार नाही. न्यायाधीश हे कायद्याने बांधील असतात, राजकारणाने नाही. न्यायनिवाडे कायदेशीर तत्त्वांनुसार लिहिलेले असतात, असेही न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी स्पष्ट केले होते.
काय होते दिल्लीतील नवीन मद्य धोरण?
22 मार्च 2021 रोजी दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्लीसाठी नवीन दारू धोरण जाहीर केले होते. 17 नोव्हेंबर 2021 रोजी नवीन मद्य धोरण म्हणजेच उत्पादन शुल्क धोरण 2021-22 लागू करण्यात आले. हे धोरण आल्यानंतर दिल्ली. सरकारचे दारू दुकानांवरील नियंत्रण खासगी यंत्रणेच्या हाती गेले. दारु व्यवसायातील माफिया राजवट संपेल आणि सरकारचा महसूल वाढेल, असा सरकारचा अंदाज होता. मात्र हे नवीन धोरण सुरुवातीपासूनच वादात राहिले. गोंधळ वाढल्यावर 28 जुलै 2022 रोजी सरकारने नवीन दारू धोरण रद्द करून जुने धोरण पुन्हा लागू केले होते.
सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा नाही,२९ एप्रिलला पुढील सुनावणी
दिल्ली मद्य धोरण प्रकरणी ईडीने केजरीवालांना २१ मार्च रोजी अटक केली होती. त्यांनी अटक बेकायदा असल्याचा दावा करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. १० एप्रिल रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांची याचिका फेटाळली होती. या निकालाला आव्हान देणारी याचिका केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर आज (दि.१५ एप्रिल ) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने ‘ईडी’ला नाेटीस बजावली आहे. या प्रकरणी ‘ईडी’ला २४ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करावे, असा आदेश खंडपीठाने दिला आहे. तसेच या प्रकरणी पुढील सुनावणी २९ एप्रिल राेजी हाेईल, असेही स्पष्ट केले आहे.