कोल्हापूरच्या 27; हातकणंगलेच्या 32 उमेदवारांचे अर्ज वैध

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : सर्व प्रमुख उमेदवारांसह कोल्हापूर मतदारसंघातील 27 व हातकणंगले मतदारसंघातील 32 उमेदवारांचे अर्ज शनिवारी झालेल्या छाननीत वैध ठरले. कोल्हापूरमधील दोन उमेदवारांचे तीन तर हातकणंगले मधील 5 उमेदवारांचे 5 अर्ज असे सात उमेदवारांचे आठ अर्ज अवैध ठरले. सोमवारी (दि. 22) दुपारी तीनपर्यंत माघार घेता येणार आहे. त्यानंतरच निवडणुकीचे रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी 28 उमेदवारांचे एकूण 42 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या अर्जांच्या छाननीला शनिवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकरी दालनात प्रारंभ झाला. साडेअकरा वाजता छाननी प्रक्रिया पूर्ण झाली. बहुजन समाज पार्टीचे संदीप शिंदे यांचे दोन तर अपक्ष म्हणून डमी अर्ज दाखल केलेल्या माजी आमदार मालोजीराजे यांचा एक अर्ज अवैध ठरला. कोल्हापूर मतदारसंघातून 27 उमेदवारांचे एकूण 39 अर्ज वैध ठरले.
हातकणंगले मतदारसंघासाठी 36 उमेदवारांचे एकूण 55 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात सकाळी 11 वाजता छाननी सुरू झाली.
दुपारी साडेबारा वाजता ती पूर्ण झाली. छाननीत कामगार किसान पार्टीचे संतोष केरबा खोत, अपक्ष जगन्नाथ भगवान मोरे, बाळकृष्ण काशिनाथ म्हेत्रे, विश्वास आनंदा कांबळे व अस्मिता सर्जेराव देशमुख या पाच उमेदवारांचे पाच अर्ज अवैध ठरले. 32 उमेदवारांचे 50 अर्ज वैध ठरले.
छाननी प्रक्रियेला निवडणूक निरीक्षकांची उपस्थिती
कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निरीक्षक, निवडणूक खर्च निरीक्षक व निवडणूक पोलिस निरीक्षकांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या दालनात सुरू असलेल्या छाननी प्रक्रियेसाठी उपस्थिती लावली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात नोडल अधिकार्यांकडून त्यांनी निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला.
कोल्हापूर मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक रोहित सिंग, खर्च निरीक्षक चेतन आर. सी., हातकणंगलेचे निवडणूक निरीक्षक संदीप नांदुरी, खर्च निरीक्षक श्रीमती हरिशा वेलंकी व कोल्हापूर व हातकणंगलेचे निवडणूक पोलीस निरीक्षक विवेकानंद शर्मा यांनी निवडणूक कामकाज, निवडणूक खर्च नियंत्रण व कायदा व सुव्यवस्था आदी विविध विषयांचा आढावा घेतला.
प्रमुख उमेदवारांचे अर्ज वैध
छाननीत कोल्हापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज, महायुतीचे संजय मंडलिक, हातकणंगले मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने, स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी, महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील-सरूडकर, वंचितचे डी. सी. पाटील, भारतीय जवान किसान पार्टीचे रघुनाथ पाटील आदी प्रमुख उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
