निवडणूक लोकसभेची, विभागणी जिल्हा बँक संचालकांची

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मात्र एकत्र आले आहेत; तर एकत्र लढलेले लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात मात्र एकमेकांविरोधात उभा ठाकले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा बँकेच्या संचालकांमध्ये विभागणी झाली असून, बँकेचे निम्म्यापेक्षा अधिक संचालक महायुतीच्या प्रचारात, तर महाविकास आघाडीच्या बाजूने प्रचार करणार्या संचालकांची संख्या कमी असली, तरी त्यामध्ये जिल्ह्यातील वजनदार नेत्यांचा समावेश आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ, आ. पी. एन. पाटील, आ. सतेज पाटील, आ. विनय कोरे, आ. राजेश पाटील, आ. राजूबाबा आवळे, माजी आ. अमल महाडिक या सर्वांनी एकत्र येत ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यामध्ये त्यांना यश आले आही. खासदार संजय मंडलिक, आ. प्रकाश आबिटकर, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी एकत्र येऊन त्यांच्या विरोधात आघाडी स्थापन केली होती. ही निवडणूक टाळण्यासाठी पालकमंत्री मुश्रीफ, आ. सतेज पाटील, आ. पी. एन. पाटील यांनी प्रयत्न केले. परंतु, त्यांना यश आले नाही. या निवडणुकीत विरोधी आघाडीला तीन जागा मिळाल्या. त्यापैकी निवडून आलेले संचालक संजय मंडलिक हे लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवारच आहेत. जिल्हा बँकेत ज्यांच्या विरोधात लढले ते पालकमंत्री हसन मुश्रीफ हेच आता लोकसभा निवडणुकीत खासदार मंडलिक यांच्या प्रचाराची धुरा वाहत आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ, आ. पी. एन. पाटील, आ. सतेज पाटील, आ. विनय कोरे, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ. राजूबाबा आवळे, आ. राजेश पाटील, माजी खा. निवेदिता माने, माजी आ. अमल महाडिक, ए. वाय. पाटील हे सर्व एकत्र होते. आता लोकसभेच्या निवडणुकीत पालकमंत्री मुश्रीफ यांच्यासह आ. विनय कोरे, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ. राजेश पाटील, माजी खासदार निवेदिता माने, माजी आ. अमल महाडिक, हे महायुतीच्या बाजूने प्रचार करत आहेत; तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा आ. पी. एन. पाटील, आ. सतेज पाटील, आ. राजूबाबा आवळे, ए. वाय. पाटील ही प्रमुख मंडळी प्रचार करत आहेत.
सहकारी संस्था पदाधिकार्यांवर प्रचाराची धुरा
लोकसभा निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापले असून, सहकारी संस्थांचे पदाधिकारी प्रचाराची धुरा वाहत आहेत. जिल्ह्याची आर्थिक नाडी म्हणून ओळखण्यात येणार्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्या ताब्यात राहावी म्हणून जिल्ह्याचे नेते प्रयत्न करत असतात. त्यासाठी पक्ष बाजूला ठेवून भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आदी सर्व पक्षांचे नेते एकत्र येतात. वेळप्रसंगी निवडून येण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्त्यालादेखील पक्षातील नेते गप्प बसविण्याचा प्रयत्न करत असतात.
