दिल्लीच्या मैदानावर हैदराबादचा दणदणीत विजय

गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा 67 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने ट्रॅव्हिस हेडच्या 32 चेंडूत 89 धावा, अभिषेक शर्माच्या 12 चेंडूत 46 धावा आणि शाहबाज अहमदच्या 29 चेंडूत नाबाद 59 धावांच्या जोरावर 20 षटकात 7 गडी गमावून 266 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीसाठी जॅक फ्रेझर मॅकगर्कने झंझावाती खेळी खेळली आणि 18 चेंडूत …

दिल्लीच्या मैदानावर हैदराबादचा दणदणीत विजय

गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा 67 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने ट्रॅव्हिस हेडच्या 32 चेंडूत 89 धावा, अभिषेक शर्माच्या 12 चेंडूत 46 धावा आणि शाहबाज अहमदच्या 29 चेंडूत नाबाद 59 धावांच्या जोरावर 20 षटकात 7 गडी गमावून 266 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीसाठी जॅक फ्रेझर मॅकगर्कने झंझावाती खेळी खेळली आणि 18 चेंडूत 65 धावा केल्या, मात्र तो बाद झाल्यानंतर दिल्लीचा डाव फसला आणि संघ 19.1 षटकांत 199 धावा करून सर्वबाद झाला. दिल्लीकडून कर्णधार ऋषभ पंतने 35 चेंडूत 44 धावा केल्या. हैदराबादकडून टी. नटराजनने चार षटकांत 19 धावा देत चार बळी घेतले. (DC vs SRH)
हैदराबादने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. अवघ्या 25 धावांवर टीमने पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नरच्या विकेट्स गमावल्या. यानंतर मॅकगर्कने झंझावाती खेळी करत दिल्लीची धुरा सांभाळली आणि अवघ्या 15 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे आयपीएलच्या चालू हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक आहे. मॅकगर्कने या मोसमातील दुसरे अर्धशतक झळकावले. मात्र, मयंक मार्कंडेने मॅकगर्कला बाद करून हैदराबादला दिलासा दिला आणि त्यानंतर दिल्लीने सातत्याने विकेट गमावल्या. यामुळे दिल्लीला आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले.
या विजयासह सनरायझर्स हैदराबाद संघाने केकेआरला मागे टाकत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे, तर दिल्ली संघ एका स्थानाने घसरून सातव्या स्थानावर पोहोचला आहे.
तत्पूर्वी, हैदराबादचे सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या स्फोटक खेळीनंतर शहबाज अहमदच्या अर्धशतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्ससमोर 267 धावांचे लक्ष्य ठेवले. दिल्लीने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. हैदराबादने तुफानी फलंदाजी करत 20 षटकांत सात गडी गमावून 266 धावा केल्या. हैदराबादसाठी ट्रॅव्हिस हेडने 32 चेंडूंत 11 चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 89 धावा केल्या, तर शाहबाज 29 चेंडूंत दोन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद 59 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने दिल्ली कॅपिटल्ससाठी अप्रतिम गोलंदाजी करत चार षटकांत 55 धावा देत चार बळी घेतले.
प्रथम फलंदाजी करताना हेड आणि अभिषेक यांनी शानदार खेळी करत बिनबाद 125 धावा केल्या. ही आयपीएलच्या इतिहासातील पॉवरप्लेमध्ये केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी, पॉवरप्लेमध्ये सर्वोच्च धावसंख्या केकेआरच्या नावावर होती. त्यांनी 2017 साली आरसीबीविरुद्ध बिनबाद 105 धावा केल्या होत्या. हेड आणि अभिषेकने प्रत्येक गोलंदाजावर निशाणा साधला. हेडने 16 चेंडूत अर्धशतक झळकावले. पॉवरप्लेमध्ये हेड आणि अभिषेकची फलंदाजी पाहून हैदराबाद पुन्हा एकदा आपला विक्रम मोडेल आणि आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या करेल, असे वाटत होते, पण पॉवरप्ले संपताच कुलदीप यादवने अभिषेक शर्माला बाद करून ही भागीदारी तोडली. अभिषेक 12 चेंडूत 46 धावा करून बाद झाला. तो बाद होताच हैदराबादचा डाव फसला आणि काही वेळातच संघाने चार विकेट गमावल्या.
कुलदीपने हेडलाही शतक झळकावण्यापासून रोखले. मात्र, अखेर शाहबाज अहमदने स्फोटक खेळी करत संघाची धावसंख्या 260 च्या पुढे नेली. हैदराबाद संघ आयपीएलच्या इतिहासात तीन वेळा 250 हून अधिक धावा करणारा एकमेव संघ ठरला आहे. याआधी याच मोसमात हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध तीन गड्यांच्या मोबदल्यात 277 धावा आणि आरसीबीविरुद्ध तीन विकेट्सवर 287 धावा केल्या होत्या. गोलंदाजीमध्ये दिल्लीच्या कुलदीप यादवने सर्वाधिक 4 तर मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Celebrations in the @SunRisers camp as they wrap 🆙 a massive win with that wicket of the #DC skipper 🙌
With that, they move to the 2️⃣nd spot on the Points Table 🧡
Recap the match on @StarSportsIndia and @JioCinema 💻📱#TATAIPL | #DCvSRH pic.twitter.com/Ou5g1Tgi55
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2024

हेही वाचा : 

Kolhapur News : रस्त्यावर पंक्चर काढणे बेतले चालकाच्या जीवावर, कंटेनरला टिप्परची धडक; चालक ठार
नागपूर : रविवारपासून विदर्भात, वर्धेत शरद पवार, उध्दव ठाकरेंच्या सभा
Vinesh Phogat : कुस्तीपटू विनेश, अंशू मलिक यांचे पॅरिस ऑलिंपिक तिकीट फायनल